महापालिका रुग्णालयांचे 'आरोग्य' सुधारण्यास लागणार वेळ
पुणे: पुणे महापालिकेकडून रुग्णांना चांगल्या आणि अल्प दरात सुविधा देण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र असुविधांमुळे रुग्ण रुग्णालयांकडू पाठ फिरवतात. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढावी यासाठी रुग्णालयांमध्ये अदययावत सुविधा देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. परंतु, यानिर्णयानुसार गेल्या दोन महिन्यांत रुग्णांलयाच्या सुधारणांबाबत कोणतीही प्रगती झाली नाही. तसेच यासाठी आणखी दोन महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार असल्याचे समोर आले आहे.
महापालिकेने रुग्णालयांची स्थिती सुधारण्यासाठी आराखडा तयार केला आहे. या आराखड्याला पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे. यामध्ये महापालिकेच्या तीन प्रमुख रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर, पुरेसे मनुष्यबळ आणि अत्याधुनिक उपचारांसह चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना होती. पहिल्या टप्प्यात मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालय, भवानी पेठेतील सोनवणे रुग्णालय आणि येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयाची सुधारणा करण्यात येणार होती. मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्याचे समोर आले आहे.
या रुग्णालयांमध्ये रुग्णांवर उत्तम उपचार, स्वच्छता, खाटांची संख्या वाढविण्याबरोबरच अत्याधुनिक उपचार देण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या दोन महिन्यांत हे काम पूर्ण होईल. या रुग्णालयांमध्ये रेडिओलॉजिस्ट, सर्जन, बालरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ आणि इतर डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
महापालिका रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक उपचार उपलब्ध करून देण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यापैकी तीन रुग्णालयांसाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. मात्र, कोणत्याही संस्थेकडून प्रतिसाद मिळाला नाही. लवकरच यासाठी पुन्हा निविदा काढण्यात येणार आहे. मार्च २०२४ पर्यंत या सर्व रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून सेवा सुरू केल्या जातील.
- डॉ.भगवान पवार, आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका.
दुसऱ्या टप्प्यातील रुग्णालयांसाठी पुन्हा निविदा..
दुसऱ्या टप्प्यात सिंहगड रोडचे लायगुडे हॉस्पिटल, शिवाजीनगरचे दळवी हॉस्पिटल आणि हडपसरचे मगर हॉस्पिटल महापालिका प्रशासनाकडून अपग्रेड केले जाणार होते. ही रुग्णालये पीपीपी मॉडेलवर अपग्रेड करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठीची निविदाही आरोग्य विभागाने काढली होती. परंतु, या निविदेला कोणत्याही संस्थेकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता प्रशासन पुन्हा यासाठी निविदा काढणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.
आधिकाऱ्यांच्या बदलीमुळे उशीर...?
राज्य सरकारने महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांची दोन महिन्यांपूर्वी बदली केली होती. मात्र त्यांनी पाच महिन्यांपूर्वीच महापालिकेच्या आरोग्य अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यामुळे बदलीच्या विरोधात डॉ. पवार मॅटमध्ये गेले होते. गेल्या आठवड्यात मॅटने डॉ. पवार यांची बाजूने निर्णय देत त्यांची बदली रद्द केली. त्यानंतर आता डॉ. पवार यांनी पुन्हा महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याचा पदभार स्वीकारला आहे. आरोग्य विभागातील बदलीच्या गोंधळामुळे रुग्णांलयांच्या सुधारणांचे आरोग्य बिघडल्याची चर्चा सुरु आहे.