PMPML Accident : 'ब्रेक फेल' पीएमपीएमएलचा थरार; चालकाच्या प्रसंगावधानाने टाळला मोठा अनर्थ

काळ आला होता पण वेळ आली नव्हती या म्हणीचा प्रत्यय शुक्रवारी कर्वेनगर वासियांना आला. प्रवासी घेऊन नात असलेल्या पीएमपी बसचे ब्रेक फेल झाले आणि उतारावर ही बस भरधाव वेगात खाली येत असतानाच चालकाने प्रसंगावधान राखत ही बस एका इमारतीच्या भिंतीला धडकवत थांबविली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Fri, 22 Sep 2023
  • 05:33 pm
PMPML Accident

'ब्रेक फेल' पीएमपीएमएलचा थरार

लक्ष्मण मोरे

पुणे : काळ आला होता पण वेळ आली नव्हती या म्हणीचा प्रत्यय शुक्रवारी कर्वेनगर वासियांना आला. प्रवासी घेऊन नात असलेल्या पीएमपी बसचे ब्रेक फेल झाले आणि उतारावर ही बस भरधाव वेगात खाली येत असतानाच चालकाने प्रसंगावधान राखत ही बस एका इमारतीच्या भिंतीला धडकवत थांबविली. त्यामुळे रस्त्यावरील नागरिक आणि प्रवासी यांचे प्राण वाचले. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली.

याविषयी मिळालेली माहिती अशी की, साधारणपणे २५-३० प्रवासी घेऊन पीएमपीएमएल बस एनडीएकडून महापालिकेकडे चालली होती. दुपारी साधारण साडेतीनच्या सुमारास ही बस कर्वेनगर जवळ आली. वनदेवी मंदिरापासून ही बस गांधीभवनकडे उतारावर जात होती. त्यावेळी बसमधून जोरजोरात हवा गेल्यासारखा आवाज येऊ लागला. या बसचे चालक हनुमंत मधुकर आढाळे (वय ५०) यांना बसचे चाक पंक्चर झाल्यासारखे वाटले. त्यांनी ब्रेक मारून बस थांबविण्यासाठी प्रयत्न केला. परंतु, ही बस थांबत नव्हती. ब्रेक फेल झाल्याचा अंदाज आल्याने चालक आढाळे यांच्या काळजाचा ठोका चुकला. बँक ऑफ महाराष्ट्रपासून गांधी भवनपर्यंत तीव्र उतार आहे. उत्सवाचे दिवस असल्याने रस्त्यावर नागरिक मोठ्या प्रमाणावर होते. बस थांबली नाही तर अनेक वाहनांना धडक बसण्याची आणि मोठा अपघात घडून जीवितहानी होण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे ही बस काहीही करून थांबविणे अत्यावश्यक होते. 

चालक आढाळे यांनी  संयम बाळगत तसेच प्रसंगावधान राखत उताराजवळ असलेल्या योगदा अपार्टमेंटजवळील रुपी बँकेची शाखा असलेल्या इमारतीवर ही बस चढवली. कठड्याला धडकून मोठा झटका खात ही बस जागेवर थांबली. दरम्यान, बसमधील प्रवाशांना नेमके काय घडले याचा अंदाज आलेला होता. सर्व प्रवाशांनी चालक आढाळे यांचे आभार मानत त्यांना धन्यवाद दिले. 

ब्रेक फेल झालेली ही बस जर उतारावर गेली असती तर मोठा अपघात घडून मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाली असती. बस कशी थांबवायची या विचारात मी होतो. एखाद्या इमारतीच्या भिंतीवर बस नेण्याचा विचार डोक्यात आला. समोर दिसलेल्या योगदा सोसायटीमध्ये बस घुसविताना पदपथावरुन जाणाऱ्या नागरिकांना धोका होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागणार होती. अपघात न घडता बस बाजूला नेणे ही एक कसोटीच होती. बस पदपथावरुन चढली. बसच्या धडकेने भिंत पडली. परंतु, बस थांबविण्यात यश आले. 

- हनुमंत आढाळे, बस चालक

मी इमारती जवळील पदपथावरुन जात होतो. त्यावेळी अचानक भरधाव बस समोरून आली. समोरून येत असलेली बस पाहून मी बाजुला झालो. काही कळायच्या आतच ही बस इमारतीमध्ये घुसली. नंतर समजले की बसचे ब्रेक फेल झाले होते. चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला.

- बाबासाहेब सोनवणे, नागरिक

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest