Accident : नवदाम्पत्यावर काळाचा घाला! जेजुरी देवदर्शनावरून परत येत असताना रिक्षा विहिरीत कोसळली; तिघांचा मृत्यू

रविवारी लग्न झालेल्या नवदाम्पत्यासह कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. सोमवारी जेजुरी येथे देवदर्शनासाठी गेलेले हे कुटुंब ऑटो रिक्षा मधून परत येत असताना भीषण अपघात झाला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Wed, 27 Sep 2023
  • 03:39 pm
Accident

जेजुरी देवदर्शनावरून परत येत असताना रिक्षा विहिरीत कोसळली

पुणे : रविवारी लग्न झालेल्या नवदाम्पत्यासह कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. सोमवारी जेजुरी येथे देवदर्शनासाठी गेलेले हे कुटुंब ऑटो रिक्षा मधून परत येत असताना भीषण अपघात झाला. रिक्षाचे ब्रेक निकामी झाल्यामुळे ही रिक्षा कठडा तोडून थेट एका शेतातील विहिरीमध्ये जाऊन पडली. निर्मनुष्य ठिकाण आणि  रात्रीच्या अंधारामुळे हा अपघात कोणाला समजला नाही. मंगळवारी सकाळी अपघात लक्षात आला. या अपघातात नवदाम्पत्यासह तिघा जणांचा मृत्यू झाला असून रिक्षा चालकासह दोघा जणांना वाचविण्यात यश आले आहे. या अपघातामुळे पुण्यातील धायरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 रोहित विलास शेलार (वय २३),  वैष्णवी रोहित शेलार (वय १८, दोघेही रा. धायरी) या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच त्यांच्यासह श्रावणी संदीप शेलार (वय १७, रा. धायरी) हिलाही प्राण गमवावे लागले आहेत. या अपघातात रिक्षाचालक आदित्य मधुकर घोलप (वय २२) आणि शीतल संदीप शेलार हे दोघे बचावले आहेत. सासवड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोहित हा पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामध्ये काम करतो. तर, वैष्णवी ही गृहीणी होती. श्रावणी ही इयत्ता ११ वीमध्ये विज्ञान शाखेत शिकत होती. ती रोहितची चुलत बहीण होती. रोहितचे वैष्णवीसोबत रविवारी लग्न झाले होते. सोमवारी हे दोघेजण चुलत बहीण श्रावणी, चुलती शितल शेलार यांच्यासह जेजुरी येथे देवदर्शनासाठी गेले होते. आदित्य हा रिक्षाचालक असून त्याच्याच रिक्षामधून (एमएच १२, क्युयू ७७०६) सर्वजण जेजूरीला गेले होते.

जेजुरीमध्ये देवदर्शन झाल्यानंतर सर्वजण सोमवारी रात्री पुण्याकडे परत येत होते. सासवड-खळद गावच्या हद्दीत असलेल्या रस्त्यावर त्यांच्या रिक्षाचे ब्रेक निकामी झाले. या रिक्षाची हेडलाईट देखील कमी होती. त्यामुळे रस्त्यावरील नीट दिसत नव्हते. रिक्षाचे ब्रेक निकामी झाल्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. वेगात असलेली ही रिक्षा थांबविण्यासाठी चालक आदित्यने रस्त्याच्या कडेला घेण्याचा प्रयत्न केला. ही रिक्षा काठडयाला धडकली आणि रस्त्याच्या पलीकडे गेली. येथील गोटे मळ्याजवळ ही रिक्षा महामार्गाला लागून असलेल्या एका शेतातील विहीरीमध्ये पडली. रिक्षामधील कोणालाही बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. आजूबाजूला गडद अंधार असल्याने कोणालाही अपघाताची कल्पना नव्हती. विहीरीमधून कोणाचाही आवाज ऐकू येत नव्हता. या अपघातात रोहित, वैष्णवी, श्रावणी यांचा जागीच मृत्यू झाला. तर, आदित्य आणि शीतल यांनी विहीरीमधील दोर आणि सळई धरून ठेवली होती. हे सर्वजण रात्रभर विहिरीतच होते.

मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास  खळद-सासवड रस्त्यावरून दोन तरुन जीमसाठी सासवडला निघालेले होते. त्यातील एकाच्या डोळ्यात धूळ गेल्याने ते रस्त्याच्या कडेला उभे राहून डोळा स्वच्छ करीत होते. नेमका त्याच वेळी त्यांना 'वाचवा वाचवा' असा आवाज आला. त्यांनी आवाजाचा कानोसा घेतला असता विहीरीमधून आवाज येत असल्याचे लक्षात आले. त्यांनी विहीरीत पाहिले असता दोघेजण अडकल्याचे दिसले. अपघातग्रस्त रिक्षा पाहून त्यांनी सासवड पोलीस ठाण्यात मदतीसाठी फोन केला. पोलीस निरीक्षक संतोष जाधव, पोलीस अंमलदार दत्तात्रय माने, अभिजीत कांबळे यांच्यासह अन्य पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, पोलिसांनी अग्निशामक दलाला पाचारण केले. सासवडमधून एक क्रेन देखील मागविण्यात  आली. दरम्यान, भोरवरुन भोई समाजाच्या पट्टीच्या पोहणाऱ्या व्यक्तींना बोलावण्यात आले. सासवड आणि जेजूरीच्या अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या सर्वांनी आदित्य आणि शीतल यांना बाहेर काढले. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त रिक्षा बाहेर काढली. त्यानंतर, मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सासवड पोलीस करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest