बैलगाडा शर्यतीवर उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला परवानगी दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात या निकालाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली होती. यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या बैलगाडा शर्यतीसाठी केलेला कायदा वैध ठरवत न्यायालयाने शर्यतीला परवानगी दिली आहे. यावर हा शेतकऱ्यांचा विजय आहे, हा महाराष्ट्राचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, “मला मनापासून आनंद आहे की केंद्र सरकारने केलेला कायदा आज सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवलेला आहे. ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली होती. त्यावेळी मी स्वत: मुख्यमंत्री असताना हा कायदा तयार केला होता. त्यानंतर बैलगाडा शर्यती सुरू झाल्या होत्या. मात्र, काही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. त्यामुळे सर्वोच्च न्यायालायाने बैल हा धावणारा प्राणी नाही, असे सांगून शर्यतीवर बंदी घातली होती.”
पुढे ते म्हणाले की, “आम्ही लगेच बैल हा धावणारा प्राणी आहे, हे साबूत करणाऱ्या करीता त्या ठिकाणी आपण एक कमिटी तयार केली होती. त्या कमिटीने रनिग एबिटिली ऑफ बुल म्हणजेच बैल हा धावणारा प्राणी आहे, हे साबूत करणारा अहवाल तयार करून न्यायालयात दाखल करण्यात आला होता.”
“आता आपले सरकार आल्यानंतर देशाचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना आम्ही विनंती केली. आणि आपला अहवाल त्यांनी त्याठिकाणी सादर केला. आज सर्वोच्च न्यायालयाने हा कायदा वैध ठरवला आहे. हा शेतकऱ्यांचा विजय आहे, महाराष्ट्राचा विजय आहे, सर्व सामान्यांचा विजय आहे”, असेही यावेळी फडणवीस म्हणाले.