विमानतळ रस्त्यावरून होणार विना अडथळा प्रवास
पुणे : व्हीआयपी लोकांसह सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचा असणार्या एअरपोर्ट रस्त्यावरून आता विना वाहतूकीचा अडथळा प्रवास करता येणार आहे. या रस्त्यादरम्यान असणार्या येरवडा पोस्ट कार्यालयाजवळील सम्राट अशोक चौक येथे सिग्नल यंत्रणा बुधवारी (दि. 1) कार्यान्वीत करण्यात आली आहे. त्यामुळे बेशिस्त वाहतूकीची समस्या उद्धभवणार नाही. सातत्याने होणार्या वाहतूक कोंडीचा देखील सामना वाहनधारकांना करावा लागणार नाही. पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी या बाबत पाठपुरावा केला होता. त्याला अखेर यश आले आहे.
प्रभाग क्रमांक दोन अंतर्गत एअरपोर्ट रस्त्याचा समावेश होतो. या रस्त्यावरून सातत्याने अति महत्त्वाचे अधिकारी, मंत्री यांचा प्रवास होतो. त्यांना वाहतूकीचा अडथळा होऊ नये यासाठी वाहतूक शाखेच्या वतीने सातत्याने खबरदारी घेतली जाते. महत्त्वाच्या व्यक्तींच्या दौर्यावेळी खबरदारी म्हणून या रस्त्यादरम्यान उभी असलेली वाहने, अडथळे दूर करण्यात येतात. नुकतीच पुणे येथे जी - 20 परिषदेच्या काही बैठकाही पार पडल्या. या वेळी राष्ट्रीय प्रतिनिधींच्या वाहनांचा ताफा या रस्त्यावरून जात होता. या दरम्यान सम्राट अशोक चौक, येरवडा पोस्ट येथे सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. या चौकात सिग्नलची व्यवस्था नसल्याने तसेच चौक मोठा असल्याने वाहतूकीला अडथळे येत होते.
या चौकातून विश्रांतवाडी, शिवाजीनगर, शास्त्रीनगर, एअरपोर्ट आदी भागाकडे जाणारी वाहनांची मोठी रहदारी असते. त्यामुळे वाहतूकीला शिस्त लागणे आवश्यक होते. सिग्नलअभावी अनेक वेळा अपघाताच्या देखील शक्यता निर्माण झाल्या होत्या. त्याची दखल घेत पुणे महापालिकेच्या संबंधीत विभागाकडे सिग्नल बसवावा, यासाठी डॉ. धेंडे यांनी पाठपुरावा केला होता. त्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले. महापालिका अधिकार्यांच्या सूचनेनुसार कर्मचार्यांनी सम्राट अशोक चौक, येरवडा पोस्ट येथे वाहतूक सिग्नल बसविण्याची कार्यवाही केली.
पुणे महापालिका विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदुल आणि स्मार्ट सिटीचे विद्युत प्रमूख बोरसे यांनी यासाठी सूचना दिल्याची माहिती डॉ. धेंडे यांनी केली. सिग्नल सुरू झाल्यामुळे वाहनधारकांना होणार्या त्रासातून मुक्तता मिळणार आहे. वाहतूक व्यवस्था देखील सुरळीत राहणार आहे.
जी 20 परिषदेच्या काही बैठका पुणे येथे झाल्या होत्या. या वेळी राष्ट्रीय प्रतिनिधी विमानतळावरून या मार्गावरूनच कार्यक्रमाच्या ठिकाणी जात होते. या वेळी वाहतूक कोंडीचा काही वेळ अडथळा निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर मी स्वतः आयुक्तांना पत्र देऊन सम्राट अशोक चौक येथे सिग्नलची व्यवस्था करून वाहतूक कोंडी टाळावी, अशी मागणी केली होती. त्या मागणीला यश आल्याचे समाधान आहे. तसेच बदामी चौकातून एअरपोर्ट रस्त्याकडे जाणार्या वाहनांची संख्याही अधिक आहे. त्याचाही अडथळा होऊ नये, यासाठी सम्राट अशोक चौकाच्या सिग्नलशी सुसंगत सिग्नल बदामी चौकात देखील सुरू करण्याची मागणी केली आहे. त्या बाबतही सकारात्मक कार्यवाही होणार असल्याचे अधिकार्यांनी सांगितले आहे.
- डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका