ट्रेकर रमेश पाटील
रविवारची सुट्टी आणि ट्रेक एका तरुणाच्या आयुष्यात शेवटचा ट्रेक ठरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ट्रेक दरम्यान ट्रेकरला हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना रविवारी (दि. १६) पुण्यातील मावळ ते भीमाशंकर दरम्यान ट्रेक करताना घडली आहे.
रमेश पाटील असे मृत्यू झालेल्या ट्रेकरचे नाव असून ते पिंपरी चिंचवडमध्ये वास्तव्याव होते. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने पुण्यातील ट्रेकर ग्रुपने मावळ ते भीमाशंकर या ट्रेकचे आयोजन केले होते. त्यात रमेश पाटील ही सहभागी झाले होते. रविवारच्या सकाळी पावणे सात वाजता मावळ तालुक्यातील मालेगाव बुद्रुक इथून ट्रेकची सुरुवात झाली.
काही तास निसर्गाचा आनंद घेत हा रमेश पाटील यांचा ग्रुप खेड तालुक्यातील गुप्त भीमाशंकर येथे दुपारी अडीच वाजताच्या सुमारास पोहोचला. मात्र त्याच परिसरात रमेश पाटलांना अचानक चक्कर आली अन् ते जमिनीवर कोसळले. बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या पाटलांना सर्वांनी उठवण्याचा प्रयत्न ही केला. मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
अखेर सोबत असलेल्या इतर साथीदारांनी या घटनेची माहिती घोडेगाव पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ त्यांना तळेघर येथे ग्रामीण रुग्णालयात हलवले. मात्र रमेश पाटलांकडून कोणताही प्रसाद मिळत नव्हता. त्यामुळे तिथून घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.