डोळे येण्याच्या साथीने पुणेकरांचे टेन्शन वाढले, १६०० पेक्षा अधिक मुलांना लागण
पावसाळा सुरू झाल्यामुळे जुलै महिन्यात पुण्यात डेंग्यूच्या रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली होती. मात्र, डेंग्यूचे रुग्ण वाढत असतानाच दुसरीकडे नव्या आजाराने पुणेकरांचे टेन्शन वाढवले आहे. आळंदीमध्ये डोळे येण्याची साथ आली आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये तब्बल १ हजार ६०० पेक्षा अधिक मुलांना याची लागण झाली आहे. याबाबत वैद्यकीय अधिकारी उर्मिला शिंदे यांनी माहिती दिली आहे.
पुण्यातील आळंदीमध्ये शाळा आणि वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेण्यासाठी आलेल्या शिक्षण संस्थांमध्ये मुलांना डोळ्यांच्या साथीची लागण झाली आहे. सतत डोळ्यांची जळजळ होणे, डोळ्यातून घाण येणे, डोळ्यात पाणी येणे, डोळ्यांच्या पापण्या चिटकणे अशी लक्षणे डोळे येण्याची आहेत. ज्या शाळांमध्ये डोळ्यांची साथ जास्त पसरली आहे. अशा शाळांना सुट्टी देण्याचे आवाहन देखील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.
वातावरण बदलामुळे डोळ्यांची साथ आल्याचे सांगितले जात आहे. डोळ्यांना हात लावल्यास स्वच्छ हात धुणे, डोळे आलेल्या व्यक्तीने किंवा मुलाने चष्मा घालून बाहेर पडावे, डॉक्टरांचा वेळीच योग्य सल्ला घेऊन उपचार करावेत, अशी खबरदारी घेतल्यास डोळ्याची साथ आपण रोखू शकतो असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.