कात्रज - कोंढवा रस्ता रुंदीकरणाचा मार्ग झाला मोकळा
अमोल अवचिते
पुणे : दक्षिण पुण्यातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी कात्रज-कोंढवा रस्ता (Katraj-Kondhawa road) महत्त्वाचा आहे. या रस्त्यावरून अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. या रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रुंदीकरण करण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी भुसंपादनाचा अडथळा येत होता. महापालिकेच्या (PMC) विनंतीनुसार जाग मालक आणि उद्योजक प्रकाश धारीवाल यांनी टीडीआरच्या बदल्यात तसेच विनाअट जागेचा ताबा दिला आहे. त्यामुळे कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला असून रस्त्याचे कामही सुरू केले असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Vikas Dhakne)यांनी सांगितले.
कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भुसंपादनाला नागरिकांकडून अल्पप्रतिसाद मिळत असल्याचे समोर आले होते. मात्र पालिकेकडून मिळकतदारांना विनंती करणे सुरुच होते. धारवाल यांची ६० गुंठे जागेचे भूसंपादन करावे लागणार होते. त्यासाठी त्यांच्याशी महापालिकेकडून बोलणी सुरु होती. अखेर त्यांनी जागा ताब्यात दिल्याने भुसंपादनाचा मोठा प्रश्न सुटला आहे. महापालिकेच्या प्रयत्नांना मोठे यश आले असून कोंढवा येथील टिळेकरनगर ते खडीमशीन चौक दरम्यान २४ मीटर रुंद आणि सुमारे ३०० मीटर रस्त्यासाठी उद्योजक प्रकाश धारीवाल यांनी टीडीआरच्या बदल्यात कुठल्याही अटींशिवाय जागा देण्याची तयारी दर्शविली. एवढेच नव्हे महापालिकेने या जागेचा तडजोडीने ताबा घेण्याची कागदोपत्री प्रक्रिया पुर्ण करून आजच तातडीने कामही सुरू केले आहे.
राज्य शासनाने कात्रज- कोंढवा रस्त्याच्या कामासाठी २०० कोटी रुपये निधी देण्याची घोषणा केली आहे. भूसंपादनाअभावी या रस्त्याचे काम मागील काही वर्षांपासून प्रलंबित असून वाहतूक कोंडी आणि अपघात अशी या रस्त्याची ओळख झाली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका भूसंपादनासाठी जागा मालकांशी सातत्याने संपर्क साधत असून अनेकांनी त्यांची जमिन देण्याची तयारी दर्शविली आहे.
दरम्यान, कात्रज चौक ते कोंढवा येथील खडी मशीन चौकादरम्यान रस्त्यासाठी लागणारी सर्वात मोठी जागा ही उद्योजक प्रकाश धारीवाल यांच्या मालकिची आहे. त्यांच्या साधारण ६० गुंठे जागेचे भूसंपादन करावे लागणार आहे. यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगितली. यावर धारीवाल यांनी कुठल्याही अटी, शर्ती न ठेवता तातडीने ही जागा देण्याची तयारी दर्शविली. एवढेच नव्हे महापालिकेने या जागेचा तडजोडीने ताबा घेण्याची कागदोपत्री प्रक्रिया पुर्ण करून आजच तातडीने कामही सुरू केले आहे. असेही ढाकणे यांनी सांगितले.
हॉटेल चौक ते खडीमशीन चौक या रस्त्याला पर्यायी मार्ग वापरासाठी रस्ता...
ताब्यात आलेल्या जागेवर रस्त्यावर सुरूवातीला लेव्हलिंग करून मुरूम टाकून कान्हा हॉटेल चौक ते खडीमशीन चौक या रस्त्याला पर्यायी मार्ग वापरासाठी तयार करण्यात येईल. यावरून जड वाहतूक सुरू करून जुन्या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येईल. यामुळे या रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोठी मदत होणार आहे. उर्वरीत जागा मालकांसोबतही भूसंपादनासाठी बोलणी सुरू असून त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यामुळे कात्रज- कोंढवा रस्त्याचे काम वेळेत पुर्ण करणे शक्य होईल, असा विश्वास ढाकणे यांनी व्यक्त केला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.