पुणे : रस्त्यांचा खरा हक्कदार उपेक्षितच; पुण्यात वर्षाला सरासरी १०० पादचाऱ्यांचा मृत्यू
शहरातील अनेक रस्त्यांवर पदपथ अस्तित्वात राहिलेले नाहीत. ज्या रस्त्यावर पदपथ बांधले आहेत, त्यावर अतिक्रमण करून प्रशासनाच्या नाकावर टिच्चून व्यवसाय केले जात आहेत. त्यामुळे रस्त्यावर पहिला अधिकार असलेल्या पादचाऱ्याला चालण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. पदपथावर चालता येत नसल्याने रस्त्यावर वाहनांचा सामना करताना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाच्या उदासीन कारभारामुळे गेल्या तीन वर्षांत ३२६ पादचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे महापालिकेने केवळ 'पादचारी दिन' साजरा करून प्रश्न सुटणार आहेत का, असा प्रश्न पुणेकरांकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे.
महापालिकेकडून यंदा सलग चौथ्या वर्षी पादचारी दिन साजरा केला जात आहे. हा पादचारी दिन ११ डिसेंबरला लक्ष्मी रस्त्यावर साजरा केला जाणार आहे. त्या निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. मोठ्या थाटामाटात पादचारी दिन साजरा करून महापालिकेचा पथ विभाग स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे. परंतु पादचाऱ्यांसाठी रस्त्यावर सुस्थितीतील पदपथ बांधण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अनेक रस्त्यांवर पदपथच शिल्लक ठेवलेले नाहीत. त्यामुळे एक दिवस पादचाऱ्यांसाठी रस्ता मोकळा ठेवून वर्षातील ३६४ दिवसांचे काय, असा प्रश्न पुणेकरांकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे.
पुण्यात स्मार्ट सिटीच्या नावाखाली रस्त्यांची रुंदी कमी करून काही ठिकाणी पदपथ बांधण्यात आले आहेत. या पदपथावरून पादचाऱ्यांना सुरक्षितपणे चालता येणे अपेक्षित आहे. परंतु राजकीय व्यक्तींशी संबंधित कार्यकर्ते, माननीयांच्या समर्थकांकडून पदपथावर हातगाड्या, छोटे-मोठे व्यवसाय थाटले जातात. याकडे महापालिकेचे अधिकारीच कानाडोळा करत असून त्यांच्या नावाने बिनधास्तपणे हप्तेखोरी केली जात असल्याचा आरोप पुणेकरांकडून केला जातो. अनेक ठिकाणी धार्मिक स्थळे, छोटी मंदिरे पदपथावर बांधलेली आहेत. पादचाऱ्याला पदपथावर जागा मिळत नसल्याने त्याला नाईलाजाने रस्त्याचा आधार घेत चालावे लागते. थेट वाहनांचा सामना करत जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागतो, त्यामुळे अपघात होत असून गेल्या तीन वर्षांत ३२६ जणांना जीव गमवावा लागला आहे. महापालिका मात्र एका दिवसाचा पादचारी दिन साजरा करून पुन्हा वर्षभर पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करण्यासाठी सोडून देत आहे. हा संवेदनहीनतेचा कळस असल्याची खंत पुणेकर व्यक्त करत असतात.
दरम्यान, लक्ष्मी रस्त्यावरील कुंटे चौक ते गरुड गणपती चौक हा भाग वाहनविरहित करून आकर्षक पद्धतीने सजवला जाईल. या दिवशी सकाळी आठ ते रात्री आठ हा रस्ता वाहनांसाठी बंद ठेवला जाणार आहे. या उपक्रमात अधिकाधिक शहरवासीयांना सहभागी होता यावे, यासाठी कसबा, महापालिका आणि मंडई मेट्रो स्थानकापासून सायकली उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच, पीएमपीमार्फत जादा बसदेखील रस्त्यावर आणल्या जातील. रस्तासुरक्षा कार्यशाळा, तसेच दिव्यांग, दृष्टिहीनांसाठी विशेष कार्यक्रम, चित्र प्रदर्शन, सार्वजनिक वाहतुकीसंदर्भात प्रदर्शन, रांगोळी, विविध कला व संगीत कार्यक्रम, हवेच्या गुणवत्तेची चाचणी व स्वच्छ संस्थेचे प्रदर्शन अशा कार्यक्रमांचा यात समावेश असेल, असे पथ विभाग प्रमुख अनिरुध्द पावसकर यांनी सांगितले.
पादचारी दिन साजरा करून शोबाजी केली जात आहे. महापालिका पादचाऱ्यांबाबत गंभीर नाही. केवळ पैसे खर्च करण्यात त्यांना उत्साह वाटत असतो. पादचाऱ्यांसाठी काही उपाययोजना करतील अशी अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही.
- विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.