पावसाने केली पालिकेच्या कामाची पोलखोल
लक्ष्मण मोरे
ऐन गणेश चतुर्दशीच्या दिवशी मुसळधार कोसळलेल्या पावसाने शहरात दाणादाण उडविली. या पावसामुळे बिबवेवाडी, कोथरूड, कर्वेनगर, सिंहगड रस्ता, धायरी, वारजे, माळवाडी, सूस, बावधन इत्यादी भागात दाणादाण उडाली. कोथरूड येथे प्रतिज्ञा मंगल कार्यालय या भागात अनेक सोसायट्या, बंगल्यांच्या आवारात पाणी घुसले, तर अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने गोंधळ उडाला. बिबवेवाडीमधील कॅनरा बँक आणि महेश सोसायटीच्या परिसरातील रस्त्याला नदीचे स्वरूप आले होते. दरम्यान, विसर्जन मिरवणुकीच्या गडबडीतदेखील महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी अतिरिक्त आयुक्तांसह परिस्थितीचा आढावा घेतला. पावसाने पालिकेच्या कामाची पोलखोल केली.
आयुक्त विक्रमकुमार हे टिळक चौकात मानाच्या गणपतींचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होते. मात्र, कोथरूडमधील घटनेची माहिती मिळताच त्यांना तेथून काढता पाय घेत थेट अधिकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घ्यावी लागली. गुरुवारी दुपारी चार नंतर शहरात पावसाला सुरुवात झाली. कात्रज, आंबेगाव, धायरी, नर्हे, खडकवासला, वारजे, माळवाडी, कर्वेनगर, कोथरूड, सूस, बावधन, बिबवेवाडी या भागात मोठा पाऊस झाला. अवघ्या काही मिनिटातच रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
सिंहगड रस्त्यावर विठ्ठलवाडी चौक, वडगाव पूल, पाटील हॉस्पिटल, इनामदार चौक येथे मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडून गेली. अनेक नागरिकांच्या गाड्या बंद पडल्या. पाण्याला प्रचंड प्रवाह असल्याने सिंहगड रस्त्यावर धोकादायक स्थिती निर्माण झालेली होती. सुदैवाने पावसाचा जोर कमी झाल्याने आणि क्षेत्रीय कार्यालयामार्फत चेंबरमधील कचरा बाहेर काढण्याचे काम सुरू केल्याने पाण्याचा निचरा झाला. अशी स्थिती सूस बावधनमध्ये देखील निर्माण झाली होती.
बिबवेवाडीमधील महेश सोसायटी चौकातील सर्व चेंबर ओव्हरफ्लो झाले होते. मोठ्या प्रमाणावर मैलापाणी रस्त्यावर आले होते. वाहनचालकांची मोठी तारांबळ उडाली. गणेश विसर्जनासाठी मूर्ती घेऊन जात असलेल्या नागरिकांना या मैलापाणी आणि घाणीतून मार्ग काढत जाणे जीकिरीचे झाले होते. यासोबतच कॅनरा बँक चौकातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले होते. रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.