संग्रहित छायाचित्र
पुणे : महापालिकेकडून (PMC Pune) कोट्यावधी रुपये खर्च करुन जलतरण तलाव (Swimming pool) बांधण्यात आले आहे. तलावांना नागरिकांचा प्रतिसाद चांगला मिळतो. मात्र दुरुस्तींच्या अभावी काही तलाव बंद अवस्थेत पडले आहेत. (Pune News) हे तलाव तत्काळ सुरु करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. मात्र बजेट नाही, त्यामुळे कामे करणे शक्य होत नाही. अशी उत्तरे पालिकेकडून देण्यात येत होती. आता दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली असून शहरातील १४ क्रीडा संकुलांची दुरुस्ती केली जाणार असून ३ कोटींच्या खर्चास महापालिका आयुक्तांनी मान्यता दिली आहे.
महापालिकेकडून कोरोना काळात तलाव बंद ठेवण्यात आले होते. कोरोनाची लाट ओसरताच सर्वकाही सुरळीत झाले. मात्र पालिकेचे काही तलाव तसेच क्रीडा संकुले अद्यापही सुरुच झाली नाहीत. त्यामुळे ती मोडकळीस आली आहेत. नागरिकांकडून क्रीडा संकुले तसेच तलाव सुरु करावेत अशी मागणी महापालिकेला वारंवार करण्याच येत आहे. त्या मागणीची दखल घेत महापालिकेकडून शहरातील 14 क्रीडा संकुलांची दुरूस्ती केली जाणार आहे. यात शहरातील 12 प्रमुख जलतरण तलावांचा समावेश आहे.
या १२ तलावांच्या ठिकाणी फुटलेल्या फरशा, बाके नसणे, छताला गळती, उखड्लेल्या भिंती, तसेच इतर काही असुविधांमुळे पोहण्यासाठी आलेल्या नागरिकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. लोकप्रतिनिधी देखील दुरुस्तीची कामे करुन घेण्यास हातबल झाले आहेत. त्यांच्याही मागणीला महापालिकेकडून केराची टोपली दाखविण्यात येत होती. आता ऑक्टोबर महिन्यात उन्हाच्या कडक झळांमुळे नागरिक चांगलेच हैराण झाले होते. त्यामुळे थंडावा मिळण्यासाठी जवळच्या तलावाकडे धाव घेतली जाते. मात्र खासगी तलावांचे दर आवाक्याच्या बाहेर आहेत. त्यामुळे पालिकेने तलाव सुरु करावेत अशी मागणी करण्यात आली. मात्र, प्रत्येक वेळी निधी नसल्याचे कारण देत अथवा अंदाजपत्रकात कमी निधी असल्याचे सांगत या तलावांच्या दुरूस्तीकडे दूर्लक्ष केले जात होते. त्यानंतर प्रशासनाने क्रीडा संकूल तसेच जलतरण तलावांच्या दुरूस्तीचा प्राधान्य क्रम ठरविला असून पहिल्या टप्प्यात 50 लाखांपेक्षा कमी खर्च असलेल्या तलावांची दुरूस्ती केली जाणार आहे.
शहरात 37 जलतरण बांधण्यात आलेले आहेत. त्यापैकी 31 जलतरण तलाव सुरु आहेत. तर 6 मध्ये मोठ्याप्रमाणात दुरुस्तीची कामे असल्याने ते बंद आहेत. दिवाळीनंतर महापालिकेच्या जलतरण तलावांमध्ये नागरिकांची पोहण्यासाठी गर्दी वाढते. मात्र, गेल्या काही वर्षात या तलावांचे भाडे तसेच निविदा प्रक्रीयांचा वाद तसेच करोनाकाळामुळे त्यांची नियमित देखभाल दुरूस्ती झालेली नाही परिणामी अनेक तलावांमध्ये देखभाल दुरूस्तीच्या कामांची आवश्यकता आहे. दरवर्षी जानेवारीमध्ये याबाबत चर्चा होतात. मात्र, लगेच मार्च महिन्यात अंदाजपत्रक संपल्यानंतर ही कामे होत नाहीत. त्यामुळे प्रशासनाने यंदा तलावांवर गर्दी वाढण्या आधीच त्यांची दुरूस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले आहे. तसेच वेळेत निविदा प्रक्रिया राबवून कामे सुरु करावीत, अशी मागणी देखील केली आहे.
या तलावांच्या दुरुस्तीची होणार कामे...
खराडी जलतरण तलाव, छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव वारजे, वांजळे जलतरण तलाव वडगाव, कै. निळू फुले जलतरण तलाव घोरपडी पेठ, कर्वेनगर बॅडमिंटन हॉल, कै. शिवाजीराव ढुमे क्रीडा संकुल पर्वती, गाडगीळ तलाव शनिवार पेठ आणि कै. ना. ग. नांदे जलतरण तलाव, शिवाजीनगर जलतरण तलाव, स्वातंत्र्यवीर सावरकर तलाव कौसरबाग, पिराजी कोयाजी डांगमाळी जलतरण तलाव हडपसर, ह.भ.प. बारटक्के जलतरण तलाव वारजे, छत्रपती शाहू महाराज तलाव सोमवार पेठ, कै. बापूसाहेब केदारी जलतरण तलाव वानवडी.
तलावांची दुरुस्ती करणे शक्य नसल्यास लग्न समारंभांना भाड्याने देण्याची उपरोधक मागणी
शहरातील लग्न समारंभांच्या हॉलचे भाडे न परवडणारे आहे. तसेच महापालिकेने बांधलेले बहुउद्देशीय हॉल लोकप्रतिनिधींनी व्यापलेली आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे लग्न सोहळे, वाढदिवसाचे कार्यक्रम खासगी हॉटेलच्या हॉलमध्ये करणे परवडत नाही. सध्या महापालिकेने बांधलेले तलाव दुरुस्ती अभावी बंद आहेत. कोरोनानंतरही तलाव सुरु करण्यास पालिका उदासीन आहे. तसेच पालिकेकडे पैसे नसतील तर उन्हाळ्याच्या सुट्टीत लग्नसराई सुरु आहे. तलावांचा परिसर बऱ्यापौकी मोठा आहे. त्यामुळे लग्नांच्या तारखांची बुकींग घेवून त्या पैशांतून समारंभांच्या कार्यक्रमासाठी आवश्यक त्यासोयी उपलब्ध करता येतील. यामुळे सर्वसामान्यांना अल्पदरात तलावाची जागा हॉल म्हणून वापरता येईल. अशी उपरोधक मागणी नागरिकांनी केली आहे.