संग्रहित छायाचित्र
नॅशनल बुक ट्रस्टचे कार्यालय आता मुंबई येथून कायमस्वरूपी पुण्यात हलवण्यात येणार असून त्याकरिता महापालिकेच्या एका इमारतीची जागा देखील तत्काळ भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे. केवळ पुणे पुस्तक महोत्सवापुरते काम होणार नसून वर्षभर एनबीटीचे काम पुण्यामधून होणार असल्याची माहिती माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी दिली.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने १४ ते २२ डिसेंबरदरम्यान या वर्षीच्या पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवाच्या कार्यालयाचे उद्घाटन आणि मांडवाचे भूमिपूजन माजी मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महोत्सवाचे आयोजक राजेश पांडे, खासदार प्रा. मेधा कुलकर्णी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू पराग काळकर, एनबीटी संचालक युवराज मलिक, अध्यक्ष मिलिंद मराठे, उद्योजक कृष्णकुमार गोयल, डीक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, डीईएस अध्यक्ष प्रमोद रावत, उपाध्यक्ष अशोक पलांडे, ज्येष्ठ संपादक किरण ठाकूर, भाजप नेते माधव भंडारी, फर्ग्युसन महाविद्यालय प्राचार्य डॉ. विजय तडके उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. त्याची माहिती सर्वसामान्य लोकांना समजण्यासाठी एक चित्रफीत तयार करून महोत्सवात दाखवण्यात यावी. मुलांसाठी चित्रपट महोत्सवासोबत एक पुस्तक आधारित नाटक बसवण्यात यावे. त्यामधून पुस्तकाची आवड मुलांमध्ये निर्माण होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, पुणे विद्येचे माहेरघर आहे. पुस्तक महोत्सव यंदा मोठ्या प्रमाणात होईल. मुलांना चित्रपट महोत्सव सोबत मुलांसाठी कथाकथन आणि पुस्तक वाचन कट्टा निर्माण करण्यात यावा. राजेश पांडे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, हा महोत्सव पुणेकरांचा आहे. त्याकरिता लोकसहभाग महत्त्वाचा आहे. यावर्षी चार विश्व विक्रम नोंदविण्यात येणार असून चीनचे विक्रम मोडीत निघणार आहेत. साडेसात लाख लोक महोत्सवाला यंदा भेट देतील अशी अपेक्षा आहे. पुस्तक महोत्सवामध्ये ५९८ स्टॉल असणार आहेत. साडेअकरा कोटी रुपयांची पुस्तक विक्री मागील वर्षी झाली होती. यंदा ती दुप्पट होईल. यंदा देखील एक लाख पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. युवराज मलिक यांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संजय चाकने यांनी केले. प्रसेनजीत फडणवीस यांनी आभार मानले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.