पुणे मेट्रोची पुढची धाव.... विनाचालक...; शिवाजीनगर धान्य गोडाऊनमधून होणार नियंत्रण
दिलीप कुऱ्हाडे
पुणे मेट्रो ही स्वयंचलित असून ती विनाचालक लवकरच धावणार आहे. मात्र पुणेकरांना त्याची सवय झाल्यानंतर पण हा काय प्रकार आहे असे तुम्हाला वाटेल. सुरुवातीलाच मेट्रो विनाचालक धावली तर पुणेकर घाबरून त्यात बसणार नाही. त्यामुळे प्रवाशांना सवय झाल्यानंतर मेट्रो विनाचालक धावणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
आता सर्वांनाच "ऑटोमोड "हा शब्द परिचयाचा झाला आहे. विमानसुध्दा आटोमोडवर आकाशात उडतात, त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित मेट्रो ऑटोमोड असणार आहेत. वनाझ ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट दरम्यान मेट्रो विनाचालक धावणार आहे, तर शिवाजीनगर ते हिंजवडी हा मार्ग लवकरच सुरू होत आहे. या तिन्ही मार्गांचे नियंत्रण मेट्रोचे टर्मिनल असलेल्या शिवाजीनगर येथील धान्य गोडाऊन स्थानकावर असणार आहे. मेट्रो ट्रेनच्या आतील व मेट्रो स्थानकातील शेकडो सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे नियंत्रण कक्ष शिवाजीनगरला असणार आहे. त्यामुळे येथून मेट्रोवर नियंत्रण केले जाणार आहे. त्यामुळे चालकाची आवश्यकता नसणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
पुणे मेट्रो मार्ग सपूर्ण तयार झाल्यानंतर मेट्रो अवघ्या साठ सेकंदाला प्रवाशांच्या सेवेला उपलब्ध होणार आहे. लक्ष्मी रस्त्यावरील खरेदी, बालगंधर्वला नाटक, आयनॉक्स किंवा मंगलाला सिनेमा असो की दगडूशेठ गणपतीचे दर्शन मेट्रोच्या मार्गावर आहे. त्यामुळे पुणेकरांना मोटार किंवा दुचाकी लावण्यासाठी वाहनतळ शोधण्याची गरज लागणार नाही. वातानुकूलित मेट्रोमधून प्रवास करून खरेदीचा आणि नाटक-सिनेमाचा आस्वाद घेता येणार आहे.
मेट्रोचे पुढील स्टेशन, पोलीस स्टेशन
मेट्रो प्रवासात कोणी टवाळखोरांनी महिला अथवा मुलीची छेड काढल्यास त्यांचे कृत्य मेट्रो स्टेशन परिसरात व मेट्रोमधील कॅमेरे टिपणार आहे. याची माहिती मेट्रो नियंत्रण कक्षास मिळताच ही माहिती मेट्रो मार्गावरील पोलीस स्टेशनला कळविण्यात येणार आहे. त्यामुळे मेट्रो स्थानकात येण्यापूर्वी पोलीस पोहोचतील. टवाळखोरांना तब्यात घेऊन त्यांची रवानगी पोलील स्टेशनला करतील. त्यामुळे त्यांचे पुढील स्टेशन पोलीस स्टेशन असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
भारतीय रेल्वेचा प्रवास
ल्युमियर बंधूनी २८ डिसेंबर १८९५ मध्ये 'द अरायव्हल ऑफ द ट्रेन' हा चित्रपट फ्रान्सची राजधानी पॅरिसच्या एका सभागृहात दाखविला होता. चित्रपटात फ्लॅटफॉर्मवर रेल्वे येत असल्याचेदाखविण्यात येताच प्रेक्षकांनी सभागृहातून धूम ठोकली होती. कारण प्रेक्षकांनी यापूर्वी कधीच रेल्वे पाहिली नव्हती. त्यामुळे त्यांची तारांबळ उडाली. मात्र ल्युमियर बंधूनी हाच चित्रपट पुन्हा ७ जुलै १८९६ मध्ये मुंबईयेथील वॅटसन हॉटेलमध्ये दाखविला, पण गंमत म्हणजे प्रेक्षकांनी काहीच हालचाल केली नव्हती. कारण मुंबईकरांनी चित्रपट पाहण्यापूर्वी म्हणजे ४३ वर्षांपूर्वी १६ एप्रिल १८५३ मध्ये बोरीबंदर ते ठाणे दरम्यान रेल्वे धावलेली पाहिली होती. हा संदर्भ देण्याचे कारण की ब्रिटिशांनी जरी जगातील काही देशाच्या पहिली रेल्वे भारतात सुरू केली असली तरी येथे मेट्रो धावण्यासाठी पन्नास ते साठ वर्ष वाट पाहावी लागल्याचे वास्तव आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.