संग्रहित छायाचित्र
पुणे : विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी (Vijayadashami) आपट्याची पाने सोने म्हणून वाटली जातात. तसेच पुष्पहार बनवताना आंब्याच्या झाडासह इतर झाडांची पाने प्रामुख्याने वापरली जातात. त्यामुळे झाडांच्या पानांची विक्री केली जाते. त्यासाठी पाने तोडताना झाडे देखील तोडल्याचे समोर आले आहे. यावर पालिकेने गंभीर होत असे कोणी सणाच्या निमित्ताने झाडे (PMC News) तोडताना आढळून आल्यास त्यांच्यावर महापालिकेकडून थेट दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
पुणे महानगरपालिका अधिकार क्षेत्रास महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे जतन अधिनियम १९७५ चा कायदा लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५, महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे ) वृक्षसंरक्षण व संवर्धन नियम २००९ व उच्च न्यायालाच्या २० सप्टेंबर २०१३ रोजीच्या आदेशाने वृक्ष प्राधिकरणाचे कामकाज करण्यात येते. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन (सुधारणा) अधिनियम २०२१ या कायद्यानुसार विनापरवाना झाडे जाळणे, तोडणे किंवा कोणत्याही प्रकारे झाडास हानी पोहचवणे असे कोणतेही कृत्य करणे हा गुन्हा आहे. असा गुन्हा केल्यास झाडाच्या मुल्याइतके परंतु, एक लाख रूपयांपेक्षा अधिक नसेल इतक्या रकमेच्या दंडाची शिक्षा आहे.
विजयादशमी (दसरा) सणानिमित्ताने आंबा, आपटा, कांचन, शमी आदी तसेच इतर कोणत्याही वृक्षांची तोड करू नये. कोणतीही व्यक्ती विनापरवाना वृक्ष तोडीत असल्यास किंवा विस्तार कमी करीत असल्यास महापालिकेच्या संबंधित क्षेत्रिय कार्यालयाकडे तक्रार करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
येथे करता येईल कारवाई...
सहाय्यक आयुक्त तथा वृक्ष अधिकारी/ वृक्ष प्राधिकरण कार्यालय, पुणे महानगरपालिका, यांच्याकडे तक्रार करण्याची सुविधा देण्यात आली आहे. तसेच टोल फ्री क्रमांक - १८००१०३०२२२, व्हॉटस अॅप क्रमांक ९६८९९००००२ यावर किंवा www.complaint. punecorporation.org या तक्रार पोर्टलवर अथवा एस.एम.एस. अॅलर्ट या भ्रमणध्वनी सेवा क्र. ९२२३०५०६०७ यावरही विनाविलंब एसएमएस करुवन तक्रार करता येणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.