घोरपडीतील मिरज रेल्वे लाईनवरील उड्डाणपुलाच्या कामाच्या भूसंपादनाचा प्रश्न मिटला
पुणे: घोरपडी येथील पुणे मिरज रेल्वे लाईनवरील (Pune Miraj Railway Line) उड्डाण पुलाच्या (रेल्वे ओव्हर ब्रीज-आरओबी-१) कामाला संरक्षण विभागाने (लष्करा) सन २०१६ मध्येच परवानगी दिली होती. आता प्रत्यक्ष या पुलाच्या कामासाठी भूसंपादनाचा प्रश्न मिटला असून लष्कराने मान्यता दिली आहे. असे महापालिका (PMC) प्रशासनाने सांगितले.
पुणे मिरज रेल्वेच्या ‘आरोबी-१ ’साठी नुकतीच महापालिकेचे अधिकारी आणि लष्कराच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत या प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला आहे. घोरपडी येथे पुणे मिरज लोहमार्गाच्यावर उड्डाणपूल बांधण्यासाठी लष्कराकडून भूसंपादन केले जाणार आहे. मात्र त्या बदल्यात महापालिकने लष्कराला ८ क्वार्टर बांधून द्यावे लागणार आहेत. तसेच सेवावाहिन्यांची व्यवस्था करावी लागणार आहे. या सोबतच रोख मोबदला देण्यात येणार आहे. या कामासाठी महापालिकेकडून निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला फेब्रुवारी महिन्यात ठेकेदाराला काम सुरु करण्याचे आदेश दिले जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.
पुलाच्या बांधकामासाठी रेल्वे विभाग, पुणे कॅन्टोन्मेंट यांची जागा आवश्यक आहे. त्यासाठी लष्काराने २०१६ मध्येच कॅन्टोन्मेंटची ४ हजार ५६० चौरस मिटर जागा हस्तांतरित करण्यासाठी परवानगी दिलेली आहे.
या पुर्वी पुणे - सोलापूर (आरओबी-२ ) या लोहमार्गावरील पुलाचे काम महापालिकेकडून सुरु करण्यात आले आहे. या पुलाचे काम ७० टक्के पूर्ण झालेले आहे. त्यामुळे आता पुणे मिरज लोहमार्गावरील पूल बांधण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे प्रशासानाने सांगितले. या कामासाठी निविदा काढण्यात आली असून, महापालिकेने या कामाचा खर्च ४८ कोटी रुपये इतका निश्चित केला आहे. फेब्रुवारी महिन्यापर्यंत या कामाच्या ठेकेदाराची निवड काम सुरु करण्याचे आदेश दिले जातील. या रेल्वेपुलाची एकूण लांबी ६३६ मिटर इतकी असून रुंदी साडेदहा मीटर इतकी असणार आहे.