इलेक्ट्रिक शिवाई बस
पुण्यातील शिवाजीनगर ते छत्रपती संभाजीनगर अशी इलेक्ट्रिक शिवाई बस सुरू कऱण्यात आली आहे. ही शिवाजीनगर ते छत्रपती संभाजीनगर अशी धावणारी पहिलीच बस आहे. आज (दि. १८) सकाळी शिवाजी बसस्थानकावर या बसचे ज्येष्ठ प्रवासी नागरिकांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. दरम्यान, या अगोदर ई-शिवाई बस पुणे ते अहमदनगरपर्यंतच सुरू करण्यात आलेली होती.
शिवाई ई-बस आज सकाळी शिवाजीनगरवरून छत्रपती संभाजीनगरसाठी सकाळी ६ वाजता रवाना झाली. ही बस दर एक तासाने या मार्गावर धावणार आहे. याबसेसमध्ये पूर्णतः वातानुकूलित, पुश बॅक बकेट सीट, पुढील व पाठीमागील बाजूस मराठी व इंग्रजी मधून मार्ग फलक, रीडिंग लँपची सुविधा, प्रवाशांसाठी इमर्जन्सी पॅनिक बटन, एलईडी फुट ल्याम्प, इनसाईड लगेज रॅक, तसेच बसच्या बाहेरील बाजूस मोठ्या बॅग व सामानासाठी प्रशस्त सामानाची डिकी, इमर्जन्सी हॅमर आणि प्रवाशांच्या माहितीसाठी चालक केबिनमधून आवश्यक सूचनांसाठी अनाउन्समेंट सिस्टम बसवण्यात आली आहे.
या शिवाई बसचे प्रवास भाडे शिवशाही प्रमाणेच ठेवण्यात आलेले आहे. सध्या वेगवेगळ्या प्रवर्गासाठी लागू असलेल्या सवलती, महिला सन्मान योजना, अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवासी तसेच ज्येष्ठ नागरी प्रवासी व दिव्यांगांसाठीच्या सर्व सवलती शिवाई बससाठी लागू राहणार आहेत. शिवाजीनगर ते छत्रपती संभाजीनगर करता ई-शिवाई बससाठी ५१५ रुपये भाडे असणार आहे. तर जेष्ठ नागरिक व महिला सन्मान योजने अंतर्गत सवलतीप्रमाणे २७५ रुपये प्रवास भाडे आणि दिव्यांगांसाठी १८० रुपये प्रवास भाडे लागू राहणार आहेत.