मानाच्या पाचव्या केसरी गणेशोत्सवाला सुरूवात, भक्तांकडून थाटात बाप्पांचे आगमन
टिळक पंचांगानुसार रविवारपासून केसरी गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. शनिवार पेठेतील मूर्तिकार महेश गोखले यांच्याकडून प्रथेप्रमाणे रविवारी सकाळी ९ वाजता ‘श्रीं’ची मूर्ती घेण्यात आली. त्यानंतर पारंपरिक पालखीत गणराया विराजमान झाल्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात प्रतिष्ठापनेच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. या मिरवणुकीत बिडवे बंधूंचा सनई-चौघडा, श्रीराम व शिवमुद्रा ढोल-ताशा पथकांचा समावेश होता.
प्रतिष्ठापनेच्या मिरवणुकीत टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती व ‘केसरी’चे विश्वस्त-संपादक डॉ. दीपक टिळक, ‘केसरी’च्या विश्वस्त व्यवस्थापिका व केसरी गणेशोत्सव कार्यक्रमाच्या प्रमुख डॉ. गीताली टिळक, केसरी गणेशोत्सवाचे प्रमुख व विश्वस्त-सरव्यवस्थापक डॉ. रोहित टिळक, ‘केसरी’च्या विश्वस्त डॉ. प्रणती रोहित टिळक, रौनक रोहित टिळक तसेच ‘केसरी’चे कर्मचारी व स्नेहीजन सहभागी झाले होते.
रमणबाग चौक ते शिंदे पार चौक, ओंकारेश्वर मंदिरापासून वर्तक उद्यान, नारायण पेठ पोलिस चौकीमार्गे मिरवणूक केळकर रस्त्यावरून टिळकवाड्यात प्रवेश केला. त्यानंतर, सकाळी ११.०५ वाजता ‘केसरी’ गणेशोत्सवाचे प्रमुख डॉ. रोहित टिळक व डॉ. प्रणती टिळक यांच्या हस्ते ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना करण्यात आली.
२० ते ३० ऑगस्ट दरम्यान हा गणेशोत्सव असेल. टिळक पंचांगानुसार गणेशोत्सव साजरा झाल्यानंतर सप्टेंबरमध्येदेखील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर प्रथेप्रमाणे गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन न करता मूर्ती केसरीवाड्यातील गणेश मंदिरातच ठेवली जाईल. १९ सप्टेंबर (गणेश चतुर्थी) पासून पुन्हा गणेशोत्सवाला सुरुवात होईल. या गणेशोत्सवातही दर वर्षीप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. टिळक पंचांगानुसार व्रत वैकल्ये करणार्यांच्या घरी आज गणरायाचे आगमन होईल. अन्य पंचांगाप्रमाणे सध्या निज श्रावण महिना सुरू आहे, तर पुढील महिन्यात १९ सप्टेंबर रोजी गणेशचतुर्थी आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.