ई-टॉयलेटचे पाचवे पुण्यस्मरण! पुणेकरांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली
शहरात गर्दीच्या ठिकाणी महिला आणि पुरुषांची गैरसोय होऊ नये यासाठी पालिकेने पाच वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करत ई शौचालये उभारली, मात्र वापराविना आणि देखभाल दुरुस्तीविना अडगळ ठरलेल्या ई शौचालयांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याची वेळ पुणेकरांवर आली आहे. पाच वर्षांपासून बंद असलेल्या या शौचालयांची दुरवस्था पालिकेच्या नजरेत भरत नसल्याने ही केवळ शोभेसाठीच उभारण्यात आली होती काय, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
शहरात विविध ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहांची कमतरता असल्यामुळे मोठा गाजावाजा करून २०१८ साली स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वयंचलित ई टाॅयलेट्स बांधण्यात आली. मागच्या पाच वर्षांपासून ही ई टाॅयलेट्स बंद आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या या स्मार्ट शौचालयांची नागरिकांनी पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त दुःखद अंतःकरणाने हार, फुले, अबीर गुलाल उधळून पूजा केली आणि पोस्टर लावून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
२०१८ साली गर्दीच्या ठिकाणी स्वच्छतागृहे नागरिकांना उपलब्ध व्हावीत यासाठी ई टॉयलेटची उभारणी करण्यात आली. त्यासाठी खासदार विकास निधीतून भाजपचे माजी खासदार अनिल शिरोळे यांनी निधी उपलब्ध करून दिला होता. त्यानुसार विविध ठिकाणी १५ ई-टाॅयलेट्सची उभारणी केली. सध्या यापैकी बहुतांश स्वच्छतागृहे बंद आहेत.
या ई-शौचालयांचे व्यवस्थापन आणि देखभाल दुरुस्तीचे काम एका खासगी कंपनीला दिले होते. कोरोना महामारीत कंपनीबरोबरचा करार संपला. त्यानंतर प्रशासनाने या ई शौचालयांकडे ढुंकूनही पाहिलेले नाही.ती पुन्हा सुरू करण्यासाठी काहीच ठोस पावले उचलली नाहीत. बहुतांश शौचालये बंद असल्याची कबुली महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
या ई-शौचालयांची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणच्या स्वच्छतागृहांचे दरवाजे तुटले आहेत. त्यावर विविध घाणेरड्या जाहिरातींची पत्रके चिकटवण्यात आली आहेत. काही शौचालयाला गंज चढला आहे. सव्वादोन कोटी रुपये खर्च करून जंगली महाराज रस्ता, मॉडेल कॉलनी, भांडारकर रस्त्यावरील हिरवाई गार्डन, गोखलेनगर, फर्ग्युसन रस्ता, सेनापती बापट रस्ता, विठ्ठलवाडी सिंहगड रस्ता, नीलायम ब्रिज, विमाननगर, वाडिया महाविद्यालयाजवळ आणि तळजाई टेकडी अशा ठिकाणी ई- शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे.
या शौचालयांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ, घाण पसरलेली आहे. अनेक ठिकाणचे कॉइन बॉक्स गायब आहेत. अनेक ई-शौचालयांचे कॉइन बॉक्स भुरट्यांनी फोडले आहेत. मुळात शहरात अशा ई शौचालयांची आवश्यकताच नव्हती. आपोआप आतून दरवाजा बंद होणाऱ्या शौचालयांचा वापर करण्यास नागरिक घाबरतात आणि ही शौचालये खूप महागडी आहेत. त्याऐवजी नेहमीप्रमाणे सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधायला हवी होती. त्याचा खर्च कमी आहे, वापरण्यास सुसह्य असल्याची प्रतिक्रिया आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते मुकुंद किर्दत यांनी 'सीविक मिरर'शी बोलताना व्यक्त केली.
बावधन येथील ई टॉयलेट महानगरपालिकेने प्रायोगिक तत्त्वावर चालवायला दिले आहे. तसेच शहरातील बाकी बंद शौचालये सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच ती सुरू करण्यात येतील.
- संदीप कदम, उपायुक्त, पुणे महानगरपालिका
एका शौचालयाला २० लाख खर्च केला आहे. त्यातील पंखे, विजेचे दिवे, पाणी हे सगळेच बंद असून ते पाच वर्षांपासून धूळखात पडलेले आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेली शौचालये सुरू करावीत अशी वारंवार महानगरपालिकेकडे मागणी केली मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे आम्ही त्याचे ५ वे पुण्यस्मरण आयोजित केले असून मला करदात्या नागारिकांना कळविण्यास दुःख होत आहे की, ई -टॉयलेटला देवाज्ञा होऊन ५ वर्षे पूर्ण झाली आहेत. देव त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहात आहे.
- अभिजीत बारवकर, सामाजिक कार्यकर्ते
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.