देशातील पहिले ‘महिला खुले कारागृह’ कागदावरच
दिलीप कुऱ्हाडे
येरवडा महिला खुले कारागृह हे देशातील पहिले खुले कारागृह (Women's Open Prison)आहे. या कारागृहात उंच भिंती, अंधार कोठडी, कोंदट बराकी नसतात. महिला कैद्यांच्या निवासासाठी स्वतंत्र खोल्या असतात. त्या स्वत: स्वयंपाक करू शकतात. दिवसातील सहा ते आठ तास शेतात किंवा इतर कामे मुक्त वातावरणात करतात. यासह महिलांना त्यांच्या नातेवाईकांना भेटता येते. त्यांना पॅरोल व फर्लो सुट्टी मिळते. सर्वांत महत्त्वाचे खुल्या कारागृहातील एक दिवसाचे दोन दिवस धरतात. त्यामुळे महिला असो की पुरुष कैद्यांची सुटका लवकर होते. मात्र, येरवडा महिला खुले कारागृह हे केवळ कागदावरच आहे. महिला आठ तास केवळ शेतात किंवा तत्सम कामे करतात. त्यानंतर त्यांची रवानगी पुन्हा उंच अशा भिंतींच्या आत, कोंदट वातावरणात राहावे लागते. त्यामुळे खुल्या कारागृहाची खरी संकल्पना राबविली जात नसल्याची टीका होत आहे.
महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी १५ ॲागस्ट २०१० मध्ये देशातील पहिल्या खुल्या कारागृहाचे उद्धाटन येरवड्यात केले होते. येरवडा महिला कारागृहाच्या भोवती मोठी जागा आहे. या जागेत महिलांना निवासाची व्यवस्था करता येईल, यासह समोर असलेल्या शेतीत काम करता येईल. त्यांना मुक्त वातावरणात काम केल्यामुळे खुल्या कारागृहाची संकल्पना साध्य होईल, असे धोरणकर्त्यांचे मत होते. मात्र गेल्या तेरा वर्षांत महिला कैदी आहे त्या जागेत राहून फक्त कामासाठी शेतात येतात, काम झाले की पुन्हा अंधार कोठडीत येतात. त्यामुळे खुले कारागृह केवळ कागदावरच दिसून येते. कैद्यांची ‘सुधारणा व पुनर्वसन’ हे कारागृह प्रशासनाचे बोधवाक्य आहे. मात्र, या बोधवाक्याप्रमाणे ‘ना सुधारणा होते ना पुनर्वसन’ सध्या कारागृहात कैदी संख्या दुप्पट व तिप्पट असल्यामुळे अनेक सुधारणेचे प्रकल्प राबविणे कारागृह प्रशासनाला अवघड जात आहे. महिला खुल्या कारागृहाची मोठी जागा आहे. या जागेत केवळ कैदी महिलांसाठी निवास व इतर सोई सुविधांसाठी बांधकाम करणे, कमी उंचीची संरक्षक भिंत बांधणे ही कामे होताना दिसत नाहीत. इतर कारागृहातील बराकी बांधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग काेट्यवधी रुपये खर्च करते. मात्र, महिला खुल्या कारागृहासाठी त्यांच्याकडे पैसा नाही की इच्छाशक्ती नाही असा प्रश्न पडतो.
खुल्या कारागृहातील कैदी कोण
ज्या कैद्यांना दीर्घ शिक्षा झाली आहे. उदाहरणार्थ जन्मठेप, किंवा दहा वर्षांपेक्षा अधिक कालावधीची शिक्षा आणि त्यांची कारागृहातील वागणूक चांगली आहे. त्यांना खुल्या कारागृहात पाठवितात. या ठिकाणी त्यांना पॅरोल ही १४ दिवसांची सुट्टी दिली जाते. यासह विभागीय आयुक्तांच्या आदेशाने त्यांना १ महिन्यापर्यंत फर्लोची सुट्टी देता येते. ही त्यांच्या नातेवाईकांच्या विवाहासाठी किंवा रक्तातील नातेवाईकांच्या निधनानंतर सुट्टी दिली जाते. या संदर्भात अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
महिला कैद्यांसोबत राहणाऱ्या मुलांना शिक्षा!
महिला कैद्यांसोबत सहा वर्षांच्या आतील मुले नियमाप्रमाणे ठेवता येते. या सहा वर्षांत त्यांना कारागृहाच्या बाहेरचे विश्व माहिती नसते. त्यामुळे त्यांना गाय, बैल, घोडा असे प्राणी ओळखता येत नाहीत. त्यांना केवळ तुरुंग रक्षक आणि कारागृहातील महिला कैदी हेच दिसत असतात. चार भिंतींच्या आतील त्यांचे विश्व खूपच संकुचित असते. त्यामुळे किमान खुल्या कारागृहामुळे त्यांचे विश्व रुंदावू शकते.
महिला खुल्या कारागृहासंदर्भात अपर पोलीस महासंचालक तथा महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा अमिताभ गुप्ता सांगू शकतील. “
- स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम महाराष्ट्र
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.