३५ व्या पुणे फेस्टिव्हलचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते शुक्रवारी होणार उद्घाटन !
कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, संगीत आणि क्रीडा यांचा मनोहारी संगम असणारा पुणे फेस्टिव्हल यंदा गौरवशाली ३५ वे वर्ष साजरे करत असून, याचे उद्घाटन शुक्रवार (दि. २२ सप्टेंबर) सायंकाळी ५.०० वा. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे संपन्न होईल. राज्याचे पर्यटनमंत्री गिरीश महाजन, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत हे या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
तसेच खा. रजनी पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, खा. श्रीरंग बारणे, महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी हे या प्रसंगी विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहतील अशी माहिती पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि मुख्य समन्वयक अॅड. अभय छाजेड यांनी पत्रकार परिषदेत दिली. माजी राज्यमंत्री रमेश बागवे आणि डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट पुणेच्या अध्यक्षा अबेदा इनामदार यावेळी उपस्थित होत्या.
ज्येष्ठ अभिनेत्री नृत्यांगना खा. हेमामालिनी यांचा ‘गंगा’ बॅले, लोकप्रिय पार्श्वगायक सोनू निगम म्युझिकल नाईट, ऑल इंडिया मुशायरा, जाणता राजा, मिस पुणे फेस्टिव्हल स्पर्धा, महिला महोत्सव, केरळ महोत्सव, कीर्तन महोत्सव, मराठी कवी संमेलन, इंद्रधनु, कथ्थक, भरतनाट्यम, लावणी, विविध नृत्य अविष्कार, मराठी हिंदी गीते या बरोबरच पुणे गोल्फ कप टूर्नामेंट, बॉक्सिंग, कुस्ती व मल्लखांब अशा क्रीडास्पर्धाही यंदाच्या पुणे फेस्टीव्हलची वैशिष्ट्ये आहेत.
लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यात पोहोचवला. त्यावेळी त्यामध्ये कथाकथन, कीर्तन, पोवाडे, लोककला, मेळे असे कार्यक्रम होत असत. यापासूनच प्रेरणा घेऊन १९८९ मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष खा. सुरेश कलमाडी यांनी पुणे फेस्टिव्हलची सुरुवात केली. सलग १० दिवस आणि ३५ वर्षे चालू असलेला पुणे फेस्टिव्हल देशातील मोठा सांस्कृतिक महोत्सव मानला जातो. यापासून प्रेरणा घेऊन अनेक सांस्कृतिक महोत्सव सुरु झाले. त्यामुळेच पुणे फेस्टिव्हलला ‘मदर ऑफ ऑल फेस्टिव्हलस’ म्हटले जाते. भारतरत्न पं. भीमसेन जोशी प्रथमपासून पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष होते.