'चिरिमिरी' घेतल्याचा व्हीडीओ व्हायरल झाल्याने निलंबन
#स्वारगेट
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई न करता, त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या स्वारगेट वाहतूक विभागातील बाळू दादा येडे व गौरव रमेश उभे या दोन वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
एका नागरिकाने हे दोघे जण वाहनचालकांकडून पैसे गोळा करत असल्याचा व्हीडीओ 'ट्विट' करून त्यात पुणे शहर वाहतूक पोलिसांना टॅग केले होते. त्यानंतर पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी या दोघांचे तडकाफडकी निलंबन केले आहे.
येडे आणि उभे या दोघांची नेमणूक स्वारगेट वाहतूक विभागात आहेत. बुधवारी सकाळी दहा ते पावणेअकराच्या सुमारास हे दोघे गंगाधाम आई-माता मंदिर रस्ता येथे कर्तव्यावर होते. त्यावेळी ते वाहनचालकांकडून पैसे घेतानाचा व्हीडीओ असे लिहून पाच व्हीडीओ सामािजक कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी पोलिसांच्या ट्विटरला टॅग केले होते.
हा प्रकार निदर्शनास येताच वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांनी त्याची पाहणी केली. त्यावेळी या दोघांनी संबंधित वाहनचालकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई न करता, त्यांच्याकडून पैसेसदृश स्वीकारताना दिसून आले असून त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याचे म्हटले आहे. तसेच ते वाहनचालकांना कोणत्याही प्रकारची पावती अथवा कागदपत्रे परत देताना दिसून येत नाहीत. त्यामुळे त्यांच्या या कृत्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात मलीन झाल्याचा ठपका ठेवून दोघांना निलंबित करण्यात आले आहे.