खेडमधील इमारतीच्या बांधकामाचा प्रस्ताव तातडीने सादर करा, अजित पवारांचे निर्देश

इंदापूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे संवर्धन करुन जुने बुरुज, गाव वेसेसह ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन करण्याबरोबरच गढीलगत असणाऱ्या हजरत चाँदशाहवली बाबांच्या दर्गा परिसराचा विकास करण्याचा प्रस्ताव पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने सादर करावा.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Thu, 31 Aug 2023
  • 04:30 pm
Ajit Pawar : खेडमधील इमारतीच्या बांधकामाचा प्रस्ताव तातडीने सादर करा, अजित पवारांचे निर्देश

खेडमधील इमारतीच्या बांधकामाचा प्रस्ताव तातडीने सादर करा, अजित पवारांचे निर्देश

खेड तालुक्यामधील राजगुरुनगर येथील पंचायत समिती परिसरात मध्यवर्ती प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार आहे. या इमारतीच्या बांधकामाबाबतचा प्रस्ताव पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. सदर प्रस्तावाला मुख्यमंत्री महोदयांची मान्यता मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत पुणे जिल्ह्याच्या इंदापूर आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण व संगमेश्वर तालुक्यातील ऐतिहासिक स्थळं, देवस्थानं तसंच पर्यटन क्षेत्रांच्या विकास आणि खेडमधील इमारतीसंदर्भात आज मुंबईत बैठक पार पडली. यावेळी अजित पवार यांनी निर्देश दिले आहेत. अजित पवार म्हणाले की, इंदापूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे संवर्धन करुन जुने बुरुज, गाव वेसेसह ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन करण्याबरोबरच गढीलगत असणाऱ्या हजरत चाँदशाहवली बाबांच्या दर्गा परिसराचा विकास करण्याचा प्रस्ताव पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने सादर करावा. यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करण्यात येईल. ही विकासकामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण करण्याची खबरदारी घ्यावी.

चिपळूण तालुक्यातील पेढे येथील सवतसडा धबधबा, चिपळूण-गुहागर बायपास रोडवरील पुरातन बौद्ध लेणी (दगोबाची लेणी) सुशोभीकरण करणं, इंदापूर येथील मालोजीराजे भोसले यांची गढी, हजरत चाँदशाहवली बाबांचा दरगाह, रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक, श्री मार्लेश्वर देवस्थान, श्री टिकलेश्वर मंदिर आदी क्षेत्रांना ऐतिहासिक, आध्यात्मिक, पुरातत्त्वीय वारसा आहे. या क्षेत्रांचा विकास करताना पुरातत्त्वीय महत्वं, ऐतिहासिक सौंदर्य जपण्यात यावं. नवीन बांधकाम करताना ते शेकडो वर्षांपूर्वीच्या मूळ वास्तूशी मिळतं-जुळतं असावं, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

इंदापूर, चिपळूण, संगमेश्वर तालुक्यातील पर्यटन क्षेत्रांचा परिपूर्ण आराखडा सबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी तयार करून सादर करण्याचे निर्देश दिले. या विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, आवश्यक निधी तातडीनं उपलब्ध करून देण्यात येईल, असेही अजित पवार यांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest