संग्रहित छायाचित्र
काही आठवड्यांपूर्वी रशियातील तांबोव स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी येथे एमबीबीएसच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या पुण्यातील २५ विद्यार्थ्यांसह एकूण २२५ भारतीय विद्यार्थ्यांना भारतात परतावे लागणार आहे. परदेशी विद्यार्थ्यांबाबतच्या नियमात अचानक बदल केल्याने हा अनर्थ घडल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे.
रशियन इमिग्रेशन विभागाने त्यांना ई-मेलद्वारे देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. भारतात परतण्यासाठी लाखो रुपयांचा विमान खर्च विद्यार्थ्यांनाच करावा लागणार असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यासाठी संबंधित वैद्यकीय विद्यापीठाने पैसे देण्यास नकार दिला आहे. ख्रिसमसमुळे विमानांचे तिकिटांचे दर दुप्पट झाल्यामुळे आर्थिक भार सोसावा लागणार आहे. त्यामुळे संतप्त पालक आणि विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
या संदर्भात संतप्त विद्यार्थ्यांनी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळ यांना पत्र लिहिले आहे. पत्रात नमूद केल्याप्रमाणे, तांबोव युनिव्हर्सिटीने विद्यार्थ्यांना अधिकृतपणे सूचित केले आहे की प्रथम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांनी रशियामध्ये प्रवेशासाठी दिलेली निमंत्रण पत्रे अवैध झाल्यामुळे भारतात परतणे आवश्यक आहे.
नाव न छापण्याच्या अटीवर विद्यार्थ्यांनी या संदर्भात भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडे मदतीची मागणी केल्याचे सांगितले. ‘‘त्यानुसार, रशियन इमिग्रेशन अधिकाऱ्यांशी समन्वय करण्यासाठी कृपया हा मुद्दा भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांपर्यंत पोहोचवा. मॉस्कोमधील भारतीय दूतावासाला निर्देश द्या. दूतावासाने हे प्रकरण तांबोव स्टेट युनिव्हर्सिटी आणि प्रादेशिक इमिग्रेशन कार्यालयाकडे अधिक दृढतेने उचलून बाधित विद्यार्थ्यांना सूट मिळावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.
केवळ भविष्यातील प्रवेशांसाठी नवीन नियम लागू करून, सध्याच्या विद्यार्थ्यांना रशियामध्ये राहण्याची आणि स्थानिक पातळीवर त्यांचा व्हिसा वाढवण्याची परवानगी देण्यासाठी वकील नियुक्त करा. या संकटामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गंभीर मानसिक आणि भावनिक ताण येत आहे, ज्यांनी आधीच त्यांच्या शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण बलिदान दिले आहे. भारताचे जबाबदार नागरिक या नात्याने, आमचे शैक्षणिक भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि हा अवाजवी त्रास कमी करण्यासाठी आम्ही तुमचे समर्थन मागत आहोत, असे विद्यार्थी म्हणाले.
एका विद्यार्थिनीचे पालक विजय संजना म्हणाले, ‘‘माझ्या मुलीला ऑक्टोबरमध्ये स्टुडंट व्हिसा मिळाला. तिला ऑक्टोबरमध्ये विद्यापीठाचे निमंत्रण पत्र आणि प्रवेश निश्चित झाला. मेडिकल चेकअप, हॉस्टेल सर्व सोपस्कार पार पडले. पण १३ डिसेंबरला अचानक रशियन इमिग्रेशन विभागाने सर्व नव्याने प्रवेश घेतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना ई-मेल पाठवला. त्यामुळे सर्व पालक आणि विद्यार्थी घाबरले. ख्रिसमसमुळे विमान भाडे दुप्पट झाले आहे. सर्व भारतीय विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू राहतील आणि विद्यार्थ्यांच्या व्हिसाच्या तांत्रिक पूर्ततेसाठी केंद्र सरकारने पुढाकार घेऊन सर्व विद्यार्थी आणि पालकांना दिलासा द्यावा.’’
पार्श्वभूमी आणि घटनाक्रम
1. आमंत्रण आणि व्हिसा प्रक्रिया :
विद्यार्थ्यांनी जुलै २०२४ मध्ये प्रवेशासाठी अर्ज केला,.त्यानंतर तांबोव्ह स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीने त्यांच्या अधिकृत लेटरहेडवर आमंत्रण पत्रे जारी केली. या पत्रांच्या आधारे, आम्ही दिल्लीतील रशियन वाणिज्य दूतावासातून तीन महिन्यांचा प्रवेश व्हिसा मिळवला आणि रशियामध्ये आल्यावर आवश्यक इमिग्रेशन औपचारिकता पूर्ण केल्या.
2. व्हिसा विस्तार समस्या :
आमचा व्हिसा संपुष्टात आल्याने, विद्यापीठाने आम्हाला कळवले की नवीन इमिग्रेशन नियमांनुसार सुरुवातीची आमंत्रण पत्रे आता वैध नाहीत. परिणामी, विद्यार्थ्यांनी त्यांचा अभ्यास सुरू ठेवण्यासाठी सुधारित आमंत्रण पत्रांवर आधारित नवीन व्हिसा मिळविण्यासाठी भारतात परतणे आवश्यक आहे.
3. आर्थिक आणि भावनिक भार :
या प्रक्रियेमध्ये प्रवास, व्हिसा शुल्क आणि अतिरिक्त प्रक्रियात्मक खर्चासह, प्रतिविद्यार्थी अंदाजे १ लाख पेक्षा जास्त खर्चासह महत्त्वपूर्ण खर्च समाविष्ट आहे. अनेक विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या अपंग असलेल्या पार्श्वभूमीतून आलेले आहेत, काही बँक कर्जावर अवलंबून आहेत किंवा त्यांचे कुटुंबीय त्यांच्या शिक्षणासाठी मालमत्ता विकतात.
4. विद्यापीठाकडून कारवाई नाही :
इतर रशियन विद्यापीठांप्रमाणे, जे त्यांच्या प्रादेशिक इमिग्रेशन अधिकाऱ्यांसह समान समस्यांचे निराकरण करीत आहेत, तांबोव्ह स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीने स्थानिक पातळीवर या समस्येचे निराकरण करण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले नाहीत. त्याऐवजी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना भारतात परतण्याचा सल्ला दिला आहे. अलीकडेच १० डिसेंबरपर्यंत व्हिसाच्या मुदतवाढीसाठी शुल्क गोळा करूनही, ते आता दावा करतात की ही प्रक्रिया पुढे जाऊ शकत नाही, ज्यामुळे विद्यार्थ्यांना असह्य परिस्थितीत सोडले जाते.
5. भारतीय दूतावासाकडून नाही अपेक्षित सहकार्य :
मॉस्कोमधील भारतीय दूतावासाने सांगितले आहे की ते विद्यापीठाच्या संपर्कात आहेत परंतु तांत्रिक समस्यांमुळे विद्यार्थ्यांनी भारतात परतणे आवश्यक आहे, यावर दूतावासाने भर दिला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.