Rajesh Deshmukh : व्यवसायाच्या फायद्यासाठी दुभाजक तोडल्यास कठोर कारवाई – जिल्हाधिकारी राजेश देशमुख

रस्त्याच्या बाजूच्या व्यावसायिकांनी सेवारस्ता आणि मुख्य मार्गिका यामधील दुभाजक (डिव्हायडर) तोडल्याचे आढळून आल्यास संबंधिताचा व्यवसाय परवाना रद्द करण्यासह कठोर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Wed, 17 May 2023
  • 11:13 am
व्यवसायाच्या फायद्यासाठी दुभाजक तोडल्यास कठोर कारवाई – जिल्हाधिकारी राजेश देशमुख

जिल्हाधिकारी राजेश देशमुख

डॉ. राजेश देशमुखांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा समिती बैठक संपन्न

पुणे- बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कात्रज नवीन बोगदा ते नवले पूलदरम्यान अपघातांना आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षा समितीच्यावतीने सुचविलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी घेतला. यावेळी रस्त्याच्या बाजूच्या व्यावसायिकांनी सेवारस्ता आणि मुख्य मार्गिका यामधील दुभाजक (डिव्हायडर) तोडल्याचे आढळून आल्यास संबंधिताचा व्यवसाय परवाना रद्द करण्यासह कठोर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीस पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) प्रकल्प संचालक संजय कदम, प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर आदी अधिकाऱ्यांसह ‘सेव्ह लाईफ फाउंडेशन’  संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले की, व्यवसायाला लाभ व्हावा यासाठी काही हॉटेलचालक तसेच अन्य व्यावसायिक मुख मार्गिका आणि सेवारस्ता यामधील डिव्हायडर तोडत असल्याचे निदर्शनास आले आहे. सेवारस्त्यावरील वाहन अचानक थेट मुख्य मार्गिकेवर तसेच मार्गिकेवरील वाहन अचानक वळत असल्यामुळे अपघात होऊ शकतात. त्यामुळे या व्यावसायिकांच्या विरोधात कठोर कारवाईची शिफारस करावी. गरज पडल्यास संबंधितांचे व्यवसाय परवानेही रद्द करण्यात येतील, असेही डॉ. देशमुख म्हणाले.

कात्रज बोगदा ते नवले पूलादरम्यान अपघात टाळण्याच्या अनुषंगाने जड वाहनांसाठी वेगमर्यादा ६० कि.मी. वरुन ४० कि.मी. प्रतितास इतकी घटवण्याची अधिसूचना तात्काळ काढण्याचे निश्चित करण्यात आले. खेड शिवापूर पथकर प्लाझा येथे सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीवरुन वाहतूक नियमांची जनजागृती करण्यासाठी सतत उद्घोषणा करण्यात यावी, अशाही सूचना यावेळी देण्यात आल्या.

 

विविध यंत्रणांनी सुचविलेल्या उपाययोजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली. या रस्त्यावर ब्रेक निकामी झालेल्या वाहनांना रस्त्यावरुन बाजूला जाण्यासाठी इमर्जन्सी एस्केप प्लॅनअंतर्गत बाहेर पडण्याचे ठिकाण (एक्झिट रॅम्प) तयार करण्याबाबत पाहणी केली असल्याचे एनएचएआयचे प्रकल्प संचालक कदम यांनी सांगितले. याबाबत आवश्यक तो अभ्यास करुन तात्काळ प्रस्तावाला संबंधित यंत्रणेची मान्यता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest