दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव २०२२ च्या स्पर्धेत श्रीकृष्ण तरुण मंडळ प्रथम

गणपती कसे आणायचे, कसे साजरे करावे, मिरवणूक काढणे, संपविणे याविषयी मंडळांनी बसून निर्णय करण्याची परंपरा सुरु ठेवा. कार्यकर्ते व गणेशोत्सव मंडळे परस्पर समन्वयातून जे विधायक ठरवतील, ते कसे चांगले होईल, हा प्रशासनाचा प्रयत्न राहिल, असे मत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 28 Aug 2023
  • 10:50 am
Ganeshotsav : दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव २०२२ च्या स्पर्धेत श्रीकृष्ण तरुण मंडळ प्रथम

दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव २०२२ च्या स्पर्धेत श्रीकृष्ण तरुण मंडळ प्रथम

जय गणेश भूषण पुरस्कार नाना पेठेतील साखळपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंडळाला प्रदान

गणेशोत्सवातील देखावे, प्रबोधनपर नाटके, जीवंत देखावे हे पुण्यात झाल्यानंतर इतर शहरांत त्याचे अनुकरण झाले. आता काळानुरुप बदलणा-या गोष्टींचे भान आपण ठेवायला हवे. गणपती कसे आणायचे, कसे साजरे करावे, मिरवणूक काढणे, संपविणे याविषयी मंडळांनी बसून निर्णय करण्याची परंपरा सुरु ठेवा. कार्यकर्ते व गणेशोत्सव मंडळे परस्पर समन्वयातून जे विधायक ठरवतील, ते कसे चांगले होईल, हा प्रशासनाचा प्रयत्न राहिल, असे मत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा २०२२ पुणे शहर महापालिका क्षेत्र विभागाचा पारितोषिक वितरण सोहळा गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पार पडला. यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, अंकुश काकडे, परिमंडळ १ चे उपायुक्त संदीपसिंह गिल्ल, परिमंडळ २ च्या उपायुक्त स्मार्तना पाटील, अ‍ॅड.प्रताप परदेशी, दगडूशेठ गणपती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनिल रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, विश्वस्त कुमार वांबुरे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते.

यंदाचा जय गणेश भूषण पुरस्कार नाना पेठेतील साखळपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंडळाला प्रदान करण्यात आला. स्पर्धेत कॅम्पमधील श्रीकृष्ण तरुण मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर, नारायण पेठेतील संयुक्त प्रसाद मित्र मंडळाने द्वितीय, बुधवार पेठेतील महाराष्ट्र तरुण मंडळाने तृतीय, नारायण पेठ माती गणपती मंडळ ट्रस्टने चौथे तर भवानी  पेठेतील शिवाजी मित्र मंडळाने पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या १५२ मंडळांपैकी १०४ मंडळांनी पारितोषिके मिळविली असून एकूण १४ लाख ३१ हजार रुपयांची बक्षिसे या मंडळांना देण्यात आली. सलग ४२ वर्षे ही स्पर्धा सुरु आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, पुणे शहराला स्वत:ची अशी शिस्त आहे. त्यामुळे तीन वेळा जी २० बैठका होऊन देखील कोणतीही गडबड झाली नाही. शिक्षण, आरोग्य, व्यवसाय अशा सर्वच क्षेत्रात पुणे विस्तारत चालले आहे. त्यामुळे वेळोवेळी होणा-या गर्दीचा फायदा घेऊन शहर अस्थिर करण्याचे काम सध्या सुरु आहे. यामध्ये गणेशोत्सव मंडळांची भूमिका महत्वाची असून आपल्या सभोवतालच्या परिसराचे पालक होऊन दक्षतेचे काम मंडळांनी करायला हवे.

रितेश कुमार म्हणाले, पोलीस चौकी, पोलीस स्टेशन स्तरासह वरिष्ठ पातळीवर देखील गणेशोत्सवासंदर्भात बैठका सुरु आहेत. गणेश मंडळांसह नागरिकांकडून येणा-या सूचनांचा मान ठेऊन काम करण्यास आम्ही प्रयत्नशील आहोत. सौहार्द आणि शांतपणे उत्सव साजरा होण्यासोबतच मंडळांमध्ये चांगुलपणाची स्पर्धा व्हावी. कोणत्याही प्रकारचा अहंपणा येथे असू नये. तब्बल ३६ ते ३८ तास चालणारी विसर्जन मिरवणूक वेळेत व्हावी, यासाठी प्रयत्न करु.

अण्णा थोरात म्हणाले, गणपती विसर्जन हा जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण नसताना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आणि अखिल मंडई मंडळाच्या मिरवणुकीला २ ते ४ वर्षे अडचण होत आहे. विसर्जन मिरवणुकीबाबत अनेक मंडळांशी चर्चा सुरु असून सगळ्यांना सोबत घेऊन कोणालाही अडचण न होता, योग्य निर्णय घेऊ, असेही त्यांनी सांगितले. अंकुश काकडे म्हणाले, गणेशोत्सवाशी प्रत्यक्षपणे संबंधित नसणारी अनेक पथके मिरवणुकीत सहभागी होतात. यामुळे पथकांची संख्या वाढत असून याकडे लक्ष द्यायला हवे. दरवर्षी वेळेबाबत केवळ चर्चा होते, ती चर्चा तिथेच मर्यादित राहते आणि उशीर होतो.

हेमंत रासने म्हणाले, गणेश विसर्जन मिरवणुकीला रचनात्मक आणि विधायक वळण गरजेचे आहे. मिरवणूक ३६ तास चालते. मिरवणूक किती मोठी असावी, ती किती लांबवायची हे कार्यकर्त्यांनी ठरवावे. विसर्जन मिरवणूक गतीमान करता आली, तर जास्तीत जास्त मंडळांना लक्ष्मी रस्त्याने सहभागी होता येईल आणि मिरवणूक अनंत चतुर्दशीला संपेल. याकरिता दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने पुढाकार घेतला असून गणेशोत्सव कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे सर्वसमावेशक निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले. महेश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest