ससुन रुग्णालयातील लठ्ठपणावरील विशेष शस्त्रक्रिया वार्ड सुरू
पुण्यातील ससुन सर्वोपचार रुग्णालयामध्ये बॅरिएट्रिक सर्जरी (लठ्ठपणावरील शस्त्रक्रिया) वॉर्ड बनवण्यात आला आहे. या वार्डचे उद्घाटन १६ ऑगस्ट रोजी वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य विभाग मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. या वॉर्डची क्षमता (खाटांची संख्या) १० असून नवीन इमारतीच्या चौथ्या मजल्यावरती हा वॉर्ड आहे. ससुन सर्वोपचार रुग्णालय हे बॅरिएट्रिक सर्जरी वॉर्ड असलेले महाराष्ट्रातील एकमेव शासकीय रुग्णालय आहे.
ससुन हॉस्पीटलमध्ये बॅरिएट्रीक सर्जरी पुर्णपणे मोफत केली जाते. ससुन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर हे सुप्रसिध्द बॅरियेट्रीक सर्जन आहेत आणि शासकीय रुग्णालयात ऑपरेशन करणारे एकमेव सर्जन आहेत.
महाराष्ट्र शासनाने ४ मार्च २०२३ पासून राज्यामध्ये लठ्ठपणा जनजागृती व उपचार अभियानाची सुरुवात केलेली आहे. या अभियाना अंतर्गत लठ्ठपणावरील उपचार म्हणून या वॉर्डची सुरुवात करण्यात आली आहे. तरी महाराष्ट्रातील जनतेने या सुविधेचा पुर्ण लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. संजीव ठाकूर यांनी केले आहे.
यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी त्या विभागात दाखल असलेल्या रुग्णांची आस्थेने विचारपूस केली. विभागामध्ये शस्त्रक्रीया झालेल्या १०० ते १६० किलो वजनाच्या रुग्णांची यशस्वी शस्त्रक्रीया होऊन त्यांचा सर्व औषधोपचारही मोफत होत असल्याचे व रुग्णांची रुग्णालयाविषयी असणारी चांगली भावना पाहून मंत्री मुश्रीफ यांनी समाधान व्यक्त केले व बॅरिएट्रिक सर्जरी करणारे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर व डॉ. अमेय ठाकूर यांचे विशेष कौतूक केले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.