न्यायदान करताना सामाजिक भान गरजेचे - न्या. शालिनी फणसळकर
न्यायदान करताना सामाजिक प्रश्नांचे निराकरण करणे महत्वाचे असते. त्याकरिता न्यायाधीशाने सामाजिक भान जपणेही गरजेचे आहे, असे मत निवृत्त मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती डॉ. शालिनी फणसळकर जोशी यांनी व्यक्त केले आहे. २३ ऑगस्ट रोजी भारती विद्यापीठाच्या सभागृहात पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
कोठेवाडी, शक्ती मिल या गाजलेल्या खटल्याचे न्यायदान करताना आलेले अनुभव त्यांनी कथित केले आणि न्यायदानाचे क्षेत्र किती महत्वाचे आहे, याबद्दल विधी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. समाजासाठी निस्वार्थ भावनेने काम करणाऱ्या पण प्रसिद्धीपासून दूर असलेल्या सामान्यातील असामान्य व्यक्तींना दरवर्षी 4C's Counselling Center च्या वतीने आणि भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय न्यू लॉ कॉलेज येथील कौटुंबिक व सल्ला मार्गदर्शन केंद्राच्या सहकार्याने कै. मालती रामचंद्र जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मालती जोशी सामाजिक भान पुरस्कार दरवर्षी प्रदान करण्यात येतो.
सन २०२२ या वर्षीचा पुरस्कार दिव्यांग व्यक्तींसाठी काम करणारे "अद्वैत परिवार" या संस्थेचे समन्वयक संतोष शिवाजी डिंबळे यांना न्या. शालिनी फणसळकर जोशी आणि भारती विद्यापीठ शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा विजयमाला पतंगराव कदम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच मानपत्र देऊन गौरवण्यात आले. प्रभारी प्राचार्या आणि अधिष्ठाता डॉ. उज्वला बेंडाळे यांच्यासह आदी उपस्थित होते.
यावेळी विजयमाला कदम म्हणाल्या की, सध्याच्या परिस्थितीत समाजसेवेचे अवडंबर करणारे लोक अधिक आहेत. परंतु प्रत्येकाने भान ठेवून आपले काम करणे महत्वाचे आहे. घरगुती नाती जपतानाही दुसऱ्याला काय वाटेल याचे भान ठेवले जात नाही. 'मी आणि माझं" प्रत्येकाला हवे आहे, स्वतः ची स्पेस हवी आहे, परंतु या स्पेस च्या नावाखाली फक्त स्वतःचा विचार केला जातो. एकमेकांना समजावून घेणे होत नाही. याचा तरुण पिढीने विचार करणे महत्वाचे आहे. प्रकाश जोशी यांनी त्यांच्या मातोश्रींच्या नावाने हा पुरस्कार दरवर्षी देण्याचे ठरवले. याबाबत त्यांचे आणि जोशी कुटुंबीयांचे त्यांनी अभिनंदन केले आणि कायद्याच्या विद्यार्थ्यांसमोर हा पुरस्कार प्रदान करून त्यांच्यावर योग्य संस्कारांची रुजवण घातल्याबद्दल प्राचार्या उज्वला बेंडाळे यांचेही कौतुक केले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.