फिर्यादी जॉन्सन वसंत कोल्हापुरे
चैत्राली देशमुख-ताजणे/अमोल अवचिते -
मोकळ्या घरगुती गॅस सिलिंडरचे वजन १६.१ किलो असते. भरलेल्या सिलिंडरचे वजन ३०.३०० किलोच्या घरात असायला हवे. मात्र, भारत गॅस कंपनीच्या या सिलिंडरचे वजन २८.३७५ किलोच भरले.
पुणे: सर्वसामान्य नागरिक वाढत्या महागाईने आधीच त्रस्त असताना आता दैनंदिन आयुष्यातील अनिवार्य घटक असलेल्या गॅस सिलिंडरच्या वजनातही फसवणूक केली जात असल्याचे समोर येत आहे. सिलिंडर अपेक्षित वजनापेक्षा दोन किलो कमी का भरते, असे गॅस एजन्सीच्या डिलिव्हरी बाॅयला विचारले असता त्याने पळ काढल्याचा धक्कादायक प्रकारसमोर आला आहे. (Pune News)
मंगळवार पेठेत ही घटना घडली. याप्रकरणी जॉन्सन वसंत कोल्हापुरे (वय ५५) यांनी शुक्रवारी (दि. २३) कोरेगाव पार्क येथील भारत गॅस कंपनीच्या बोले गॅस एजन्सीच्या (गुरुदत्त एव्हेन्यू, बर्निंग घाट रोड, कोरेगाव पार्क) विरोधात समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Pune Police)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापुरे यांनी घरगुती गॅस सिलिंडरची (Domestic Gas Cylinder) नोंदणी केली होती. त्यानुसार गॅस एजन्सीकडून सिलिंडर पोहविण्यासाठी रामनिवास कुमार हा डिलिव्हरी करणारा कामगार आला. त्याने नेहमीप्रमाणे सिलिंडर दिला. सिलिंडर घेताना कोल्हापुरे यांनी तो उचलून पाहिला. त्यावेळी त्यांना सिलिंडरचे वजन कमी असल्याचा संशय आला. यापूर्वीदेखील त्यांना सिलिंडरचे वजन कमी असल्याचा संशय आला होता. त्यामुळे त्यांनी यावेळी सिलिंडरचे वजन केल्यानंतर तो स्वीकारण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार कोल्हापुरे यांनी कामगाराला ‘‘सिलिंडरचे वजन करून दे,’’ असे सांगितले. मात्र त्याच्याकडे कोणताही वजनकाटा नव्हता. त्यामुळे कोल्हापुरे यांच्या घराजवळील एका दुकानात सिलिंडर घेऊन गेले. त्यावेळी घरात असलेल्या मोकळ्या सिलिंडरचे वजन करण्यात आले. ते १६ किलोच्या घरात भरले. नंतर भरलेल्या सिलिंडरचे वजन करण्यात आले.
भरलेल्या घरगुती सिलिंडरचे वजन ३०.३०० किलो असावे, असे नमूद करण्यात आले आहे. मात्र सीलबंद सिलिंडरचे वजन २८.३७५ किलो भरले. म्हणजेच, नियमानुसार अपेक्षित असलेल्या वजनापेक्षा सुमारे दोन किलो वजन कमी भरल्याचे दिसून आले. कामगाराकडे वजन कमी का भरले, अशी विचारणा केली असता त्याने ‘‘सिलिंडर लिकेज असावा,’’ असे उत्तर दिले. सिलिंडर लिकेज असल्यामुळे वजन कमी भरू शकते, हे मान्य केले असले तरी पुन्हा दुसऱ्या भरलेल्या सिलिंडरचे वजन करण्याची मागणी केली असता, त्या कामगाराने ‘‘दुसरीकडेही सिलिंडर द्यायचा आहे,’’ असे सांगून घटना स्थळावरून पळ काढला. यासंदर्भात ‘सीविक मिरर’शी बोलताना कोल्हापुरे म्हणाले, ‘‘भरलेल्या सीलबंद सिलिंडरचा टेम्पो कामगाराने आमच्या घराजवळच सोडला. याचा कोणताही परिमाण आमच्यावर होऊ द्यायचा नव्हता. तसेच कोणताही धोका आम्हाला घ्यायचा नव्हता. त्यामुळे याबाबतची तक्रार पोलिसांकडे केली.’’ गस्तीवर असलेल्या पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सिलिंडर पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. त्यानंतर गॅस सिलिंडरचे वजन कमी भरल्याने फसवणूक केल्याची तक्रार समर्थ पोलीस ठाण्यात दिली. तसेच कामगाराने सोडलेला टेम्पोदेखील पोलिसांच्या ताब्यात दिला, असेही कोल्हापुरे यांनी सांगितले.
गॅस सिलिंडरचे वजन कमी भरल्याची तक्रार पोलीस ठाण्यात आली आहे. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार गॅस एजन्सीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास करून यातील दोषींना ताब्यात घेतले जाईल.
- संदीप खंडागळे, सहायक निरीक्षक, समर्थ पोलीस ठाणे