प्लॅटिनममुळे सायलेन्सरचोरांची 'चांदी'
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
मारुती ईको या गाडीचे सायलेन्सर चोरी होण्याच्या घटनांमध्ये देशभरात वाढ झाली आहे. त्यामागील कारणदेखील तितकेच धक्कादायक आहे. या कारच्या सायलेन्सरमध्ये वापरण्यात येणारा प्लॅटिनमसारख्या अत्यंत महागड्या धातूचा काही अंश आणि त्याभोवती साचणाऱ्या मातीला मिळणारी किंमत यामुळे सध्या देशभरात मारुती ईकोच्या सायलेन्सरची चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे.
प्लॅटिनम ग्रुप ऑफ मेटल्सचा वापर करून या सायलेन्सरमधील एक भाग बनवण्यात येतो. एका ईको कारच्या सायलेन्सरची किंमत सुमारे ५८ हजार ३०० रुपयांच्या आसपास आहे. परंतु, यात काही अंशी वापरल्या जाणाऱ्या किमती धातूची (प्लॅटिनम) आणि त्याच्याभोवती जमा होणाऱ्या कार्बन, तसेच मातीची किंमत सुमारे साडेतीन हजार रुपयांच्या आसपास असल्याने सध्या चोरट्यांकडून ईको कारच्या सायलेन्सरला लक्ष्य केले जात आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या वर्षभरात १० घटनांमध्ये ईको कारचे सायलेन्सर चोरीला गेले आहेत. चाकण भागातील दिनेश कांतीलाल थोरात (वय ३२, रा. चाकण, खेड) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांनी घरासमोर लावलेल्या ईको कारचा सायलेन्सर अज्ञात चोरट्यांनी सोमवार ते मंगळवार पहाट या कालावधीत चोरून नेला.
शहरासह राज्यभरातील वाहनचोरीचे वाढते प्रमाण ही पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत असतानाच आता वाहनांचे सायलेन्सर काढून चोरून नेले जात असल्याने या चोऱ्या रोखायच्या कशा, असा प्रश्न पोलिसांसह नागरिकांसमोर उभा ठाकला आहे.
चोरटे या वाहनांवर पाळत ठेवतात. मालक गाडी पार्क करून निघून गेल्यावर तिचे सायलेन्सर काढून घेऊन जात असल्याचे या पूर्वीच्या घटनांवरून उघड झाले आहे. वाहने चोरीला जाऊ नयेत म्हणून, त्याला 'जीपीएस' आणि अन्य अतिरिक्त 'लॉक सीस्टिम' बसविण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे. नागरिकदेखील लाखो रुपयांची वाहने चोरीला जाऊ नयेत यासाठी जीपीएस यंत्रणा आपल्या वाहनात लावतात, पण आता वाहन न चोरता त्याचे सायलेन्सर काढून चोरून नेले जात असल्याने या चोऱ्या कशा रोखणार असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात असून, या प्रकरणाचा चाकण पोलीस तपास करीत आहेत.