रा. स्व. संघातर्फे विजयादशमी सघोष पथसंचलन उत्साहात
पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना दिन असलेल्या विजयादशमीच्या निमित्ताने मंगळवारी (२४ ऑक्टोबर) सकाळी रा.स्व. संघाच्या पुणे महानगर रचनेतील ५६ नगरांमधून सघोष संचलने काढण्यात आली. नऊ भागातील विविध ५६ नगरांमध्ये काढण्यात आलेल्या संचलनांमध्ये एकूण अकरा हजारांहून अधिक पूर्ण गणवेषातील स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.
दरम्यान सूस, धानोरी, लोणी काळभोर, उरळी कांचन या शहरालगत असलेल्या भागातही सघोष पथसंचलने निघाली. तिथेही नागरिकांनी पथसंचलनाचे जोरदार स्वागत केले. विविध नगरांमधील मोठ्या सोसायट्यांच्या आग्रहा व विनंतीमुळे संचलनाचे मार्ग हे सोसायट्यांमधून मार्गस्थ होतील अशा प्रकारचे नियोजन करण्यात आले होते. यावरून समाजात संघाविषयीची स्वीकारार्हता वाढल्याचे दिसून येते आहे.
विजयादशमी निमित्ताने विविध नगरांमध्ये सकाळी ७.३० वाजता सघोष संचलनांचे आयोजन करण्यात आले होते. संचलनाच्या मार्गावरून नागरिकांनी आकर्षक रांगोळी आणि विविध फुलांच्या व पाकळ्यांच्या सड्यांनी भरून गेलेले दिसत होते. दरम्यान संचलनातील स्वयंसेवकांवर व भगव्या ध्वजावर पुष्पवृष्टी करून जोरदार स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे विविध नगरांमध्ये सर्व विविध पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील संचलनाचे स्वागत केले. तर पुणे महानगराच्या विविध नगरांमध्ये प्रतिष्ठित व मान्यवर नागरिकांनी प्रमुख पाहुणे यावेळी उपस्थित राहून संचलनाची पाहणी केली.
प्रथेप्रमाणे सकाळी रा.स्व. संघाच्या वैशिष्ट्यपूर्ण घोषातर्फे शिवाजीनगर भागातील एसएसपीएमएस महाविद्यालयाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सघोष मानवंदना देण्यात आली. यावेळी संघचालक रवींद्र वंजारवाडकर व कसबा भागाचे संघचालक अॅड. प्रशांत यादव, रा.स्व. संघाच्या अखिल भारतीय समरसता गतिविधी सह संयोजक रवींद्रजी किरकोळे यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्याआधी रा.स्व. संघाचे पुणे महानगर संघचालक श्री. वंजारवाडकर व कसबा भागाचे संघचालक अॅड. यादव यांच्या हस्ते मोतीबाग कार्यालयात शंख व भगव्या ध्वजाचे पूजन व ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी संघाचे पुणे महानगर कार्यवाह सचिन भोसले आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
दरम्यान संघ कामात अधिकाधिक लोकांचा सहभाग वाढताना दिसतो आहे. अनेक तरूणांनी संघ कार्यात सहभाग वाढवित व संचलनात संपूर्ण गणवेशात सहभागी झालेले दिसून आले. तरूणांसोबत अनेक ज्येष्ठ स्वयंसेवक देखील गणवेशासह संचलनात सहभाग नोंदविला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.