बळीराजावरील संकट दूर कर, मुख्यमंत्र्यांची भीमाशंकर चरणी प्रार्थना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारी (आज) पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात जाऊन शिव शंकराची पूजा, अभिषेक करून दर्शन घेतले. यावेळी भगवान भोलेनाथाच्या चरणी लिन होऊन राज्यातील बळीराजावरील संकट दूर कर, राज्यभर समाधानकारक पाऊस पडू दे, दुष्काळाचे सावट दूर होऊन राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, राज्यातील सर्व घटकांना सुख, समाधान आणि आनंद मिळू दे अशी प्रार्थना मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकराचे दर्शन घेतल्याने मनाने अलौकिक समाधान मिळाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच पुजेनंतर भीमाशंकर देवस्थान ट्रस्टच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. वेळी खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे आदी उपस्थित होते.
भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकासासाठी शासनाने १४८ कोटींचा विकास आराखडा तयार केला असून, त्यापैकी ६८ कोटी रुपये विविध सुविधांवर खर्च करण्यात आले असल्याचे सांगितले. येथे येणाऱ्या लाखो भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही अशा सर्व मूलभूत सुविधा शासनाच्या माध्यमातून दिल्या जातील, असे यावेळी शिंदे यांनी सांगितले.
तसेच परिसरात स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि स्नानगृहाची व्यवस्था केली जाईल. याशिवाय, परिसरातील आदिवासी पाड्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असल्याचे यावेळी शिंदे यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना सांगितले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.