भटकी कुत्री
पुण्यातील वडगाव शेरी येथील ब्रह्मा सोसायटीतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांना ब्रह्मा सोसायटीत सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने ६० भटक्या कुत्र्यांना नसबंदी करून पुन्हा सोसायटीत सोडण्याचे निर्देश दिले होते. मात्र, पुढील सुनावणीपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिल्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात का होईन, परंतू दिलासा मिळाला आहे.
वडगाव शेरी येथील ६० भटक्या कुत्र्यांचा प्रश्नावरून ब्रह्मा सनसिटी कोऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांमध्ये दोन गट पडले होते. सोसायटीत राहणारे पर्यावरण प्रेमी आणि सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांमध्ये यावरून वाद सुरू होता. याला एका गटाने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर २४ एप्रिल २०२३ रोजी झालेल्या अंतिम सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांना पुन्हा ब्रह्मा सोसायटीमध्ये सोडण्यात यावीत, असे निर्देश पुणे महापालिका प्रशासनाला दिले होते. मात्र, आता नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
भटक्या कुत्र्यांनी फेब्रुवारी महिन्यात ब्रह्मा सोसायटीमध्ये खेळत असलेल्या एका सहा वर्षांच्या मुलावर हिंसक हल्ला केला. कुत्र्यांच्या टोळीने पाठलाग करत केलेल्या हिंसक हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना ‘सीविक मिरर’ने ८ फेब्रुवारीच्या अंकात ठळकपणाने मांडली होती. त्याची दखल घेऊन पालिका प्रशासनाने ब्रह्मा सनसिटीत कारवाई करून तेथील भटक्या कुत्र्यांना तेथून हलवून निरीक्षणाखाली ठेवले होते. या संदर्भात सोसायटीतील एका गटाने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर १५ मे २०२३ रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या पुढील सुनावणीपर्यंत ही स्थगिती असणार आहे. त्यामुळे सोसायटीतील नागरिकांना आता मोठा दिलासा मिळाला आहे.