वैकुंठ स्मशानभूमी
पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत होणाऱ्या धुरामुळे परिसरातील रहिवाशांना त्रास होत असल्याने नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर महापालिकेच्या विद्युत विभागने शहरातील महत्त्वाच्या स्मशानभूमीत सुधारणा करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण यंत्रणा (एसपीसी) बसविण्यात आली आहे. प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून वेळोवेळी स्मशानभूमीची तपासणी करण्यात आली होती. नुकत्याच झालेल्या बैठकीत अधुनिक यंत्रणेचा वापर केल्याने वैकुंठ स्मशानभूमीतील प्रदूषण झाले असल्याचे महामंडळाच्या सहसंचालकांनी महापालिकेचे कौतुक केले.
स्मशानभूमीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी स्मशानभूमी परिसरातील नागरिकांकडून सातत्याने करण्यात येतात. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने प्रदूषण कमी करण्यासाठी मागील काही वर्षांमध्ये याठिकाणी मोठ्या प्रमाणावर अधुनिकण यंत्रणेचा वापर केला आहे. स्मशानभूमींमधून धूर कमी करून प्रदूषण रोखण्यासाठी १३ स्मशानभूमीत एसपीसी बसविण्याचे काम करण्यात येत आहे. नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर नुकतेच राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सहसंचालक विद्यानंद मोटघरे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदुल आणि तक्रारदार नागरिकांची नुकतेच ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीमध्ये प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे विद्यानंद मोटघरे यांनी पालिकेच्या कामाचे कौतुक केले.
शहराचा विस्तार होत असताना स्मशानभूमीच्या परिसरात वस्ती वाढत आहे. स्मशानभूमीत शव दहन करण्यासाठी दिवसातील काही तास गॅस दाहिनी, विद्युत दाहिनी तसेच लाकडाचा वापर केला जातो. यातून बाहेर पडणारा धूर आणि राखेमुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे. महापालिकेने धूरासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या नियमानुसार चिमण्या उभारल्या आहेत. या चिमण्या नियमानुसारच उभारल्या असल्याचे महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पारंपारिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात येणार्या शेडमध्येही अशीच यंत्रणा आहे. प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकार्यांनी वेळोवेळी याठिकाणी प्रत्यक्ष भेट आणि तांत्रिकही तपासणी केली. यामध्ये अधुनिक यंत्रणेमुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याचे आढळून आल्याचे बैठकीत सांगितले. तसेच प्रदूषणासाठी केवळ स्मशानभूमीमधून निघणार्या धूरासोबतच रस्त्यावरील वाहनांचा धूर बांधकामाची धूळ हे घटकही तितकेच कारणीभूत असल्याचे निदर्शनास आणून देत महापालिकेच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. पारंपारीक लाकडावरील अंत्यसंस्काराचे प्रमाण कमी करण्याच्या प्रयत्न केला जात आहे. येत्या काळात अजून चार विद्युत दाहिन्या बसविण्यास येणार आहेत. यामुळे प्रदुषण आणखी कमी होण्यास मदत होईल. सध्या या स्मशानभूमीमध्ये दररोज होणार्या अंत्यसंस्कारापैकी ६० ते ७० टक्के अंत्यसंस्कार विद्युत दाहिनीमध्ये होत असल्याची माहिती कंदुल यांनी दिली.