गणवेश योजनेला पालक आणि शिक्षक संघटनेचा विरोध
“शाळा सुरू होण्यासाठी अवघा एक महिना बाकी असताना राज्य सरकारने गणवेशाबद्दल एक घोषणा केली आहे. गणवेश हा ठेकेदाराच्या फायद्याचा असून सरकार यामध्ये भ्रष्टाचार करण्याची शक्यता”, असा आरोप पालक रोहन सूर्यवंशी यांनी केला आहे. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी एक राज्य एक गणवेश योजना येत्या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात येणार आहे, अशी घोषणा केली आहे. मात्र, या निर्णयाला पालक आणि शिक्षक संघटनांकडून विरोध होत आहे. निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी पालक आणि शिक्षक संघटनाकडून केली जात आहे.
याबाबत संघटनेचे समन्वयक प्रकाश घोळवे म्हणाले की, “शालेय विद्यार्थ्यांना एकत्रित गणवेश खरेदी करण्यास महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वय समितीचा विरोध असून यापूर्वी महाराष्ट्रामध्ये एकच गणवेश होता. त्याची अमलबजावणी चालू होती. गणवेश खरेदी करण्याचे अधिकार शासनाने शाळा व्यवस्थापन समिती व शाळेचा मुख्याध्यापक यांना देण्यात आले.”
“जेमतेम शाळा भरण्यासाठी महिन्याचा कालावधी राहिलेला आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना गणवेशाचे व वह्या पुस्तकाचे वाटप केले जाते. दीड महिन्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये गणवेश उपलब्ध होणार नाही. शिक्षक मुख्याध्यापक अधिकारी यांची अडचण निर्माण होणार आहे. यासाठी शासनाने सर्व संघटना त्यांचे अध्यक्ष यांना विचारात घेऊन निर्णय घ्यावा”, असेही घोळवे म्हणाले.