आर सी बुक आणि लायसन्स गेले तरी कुठे? मेसेज ओपन होईनात
-दयानंद ठोंबरे
प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) पुणे यांच्याकडून अनेक वाहनधारक-चालकांना आरसी आणि लायसन्सचे काम पूर्ण झाले असल्याचे तसेच ३० ऑगस्ट २०२३ रोजी पोस्टामध्ये पाठवले असल्याचे मेसेजेस व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पाठवले आहेत. प्रत्यक्षात या मेसेजवर क्लिक केले असता ते ओपनच होत नाहीत. शिवाय इतर माहितीदेखील मिळत नाही. पोस्ट ऑफिसकडे चौकशी केली असता तेही अनभिज्ञ आहेत. १५०० ते २००० रोजची वाहनचालक-मालकांची नोंद होत असल्याचे समजते.
स्पीडपोस्टद्वारे पाठवलेले आरसी आणि लायसन्स जास्तीत जास्त चार दिवसात मिळणे अपेक्षित आहे, १५ दिवस झाले तरी संबंधितांना ते अजूनही मिळालेले नाहीत. या सर्व घोळामध्ये वाहनधारकांना मन:स्ताप होत आहे. तसेच वाहतूक पोलिसांकडून मोठी कारवाई होण्याची भीतीही वाटत आहे. या कारणास्तव अनेक दुकानदारांचे गाड्या खरेदी-विक्रीचे व्यवहार रखडले आहेत. याबाबत कोणाकडूनही ठोस माहिती मिळत नाही. अधिक चौकशी केली असता २१ ऑगस्ट २०२३ पासून परराज्यातील एका कंपनीला या छपाईचे काम देण्यात आले असल्याचे विविध मोटार वाहन चालक-मालक प्रतिनिधी संघाचे अध्यक्ष भारत कळके यांनी सांगितले. मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राचे या कंपनीद्वारे छपाईचे काम चालते.
जुन्या कंपनीकडून १ जून २०२३ पासूनचे लायसन्सच्या छपाईचे काम संथ गतीने चालू असल्याचे समजते. त्या कालावधीतील लायसन्स आणि आरसी अजूनही ग्राहकांना मिळालेले नाहीत. छपाईचे काम करणाऱ्या नव्या कंपनीने रोज किमान २१ हजार आरसी आणि लायसन्स छापून देणार अशी जाहिरात केली असल्याचे समजते. ही माहिती सर्वसामान्यांना मिळणे अपेक्षित आहे.
या संबंधित प्रभारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर म्हणाले की, अशा कोणत्याही तक्रारी आमच्याकडे आलेल्या नाहीत. युनायडेट टेलिकॉम लिमिटेड (यूटीएल) यांच्याकडे लायसन्स छपाईचे काम १५ वर्षांपासून होत होते. यांच्या छपाई कराराची मुदत संपल्यामुळे परिवहन आयुक्त कार्यालयाकडून नव्याने निविदा प्रक्रिया करून एमसीटी कार्ड ॲन्ड टेक्नॉलॉजी यांच्याकडे छपाईचे काम देण्यात आले आहे. २१ ऑगस्ट २०२३ पासून मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या तीन ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील छपाईचे काम यांच्याकडे चालते. ही कंपनी तीनपट जास्त छपाईचे काम करणार असल्याचे तसेच छपाईचे पूर्वीचे थोड्या प्रमाणात काम शिल्ल्क राहिल्यामुळे दिरंगाई झाली असावी. ८ दिवसात सर्वकाही सुरळीत होईल, असे भोर यांनी सीविक मिररशी बोलताना सांगितले.
रोजमार्टा या कंपनीकडून १८०० ते २००० आरसी छपाईचे काम होत होते. यूटीएलकडून १२०० ते १४०० पर्यंत लायसन्स छपाईचे काम होत आहे. या कार्यालयात १५०० ते २००० रोजची वाहनचालक मालकांची नोंद असते. रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (आरसी) यूटीएल या कंपनीकडून पोस्ट ऑफिसकडे पाठविले जाते, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.