स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदासाठी तत्सम अभ्यासक्रम उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना पात्र करा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विद्यार्थ्यांनी केली मागणी
पुणे: राज्य शासनाच्या जलसंपदा विभागांतर्गत गट-ब व गट-क पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीत इतर पदांसोबतच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट -क) संवर्गाची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. जाहिरातीत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदासाठी फक्त सिव्हिल (स्थापत्य अभियांत्रिकी) मधील पदवी किंवा पदविका अशी पात्रता ठेवण्यात आली आहे. तर या पदासाठी शासनमान्य मान्यताप्राप्त संस्थेकडून घेण्यात येणारा किमान स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा एक वर्ष मुदतीचा पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण किंवा शासनाने वेळोवेळी समतुल्य म्हणून घोषित केलेले कन्स्ट्रक्शन सुपरवायझर (बांधकाम पर्यवेक्षक) किंवा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन पाठयक्रम उत्तीर्ण अशा विविध अर्हता धारण केलेल्या उमेदवारांना पात्र करण्यात आलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना या पदासाठी अर्ज करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विद्यार्थ्यांनी केली आहे.
जिल्हा परिषद, महानगरपालिका, लघु-पाटबंधारे विभाग आणि इतर विभागांमध्ये सिव्हिल पदवी, पदविका धारक पात्र धरण्यात येते. परंतु शासनमान्य मान्यताप्राप्त संस्थेकडून घेण्यात येणारा किमान स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा एक वर्ष मुदतीचा पाठयक्रम परीक्षा उत्तीर्ण किंवा कन्स्ट्रक्शन सुपरवायझर (बांधकाम पर्यवेक्षक) किंवा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन पाठयक्रम उत्तीर्ण अशा विविध अर्हता धारण केलेल्या उमेदवारांना सुध्दा अर्ज करण्यास पात्र करण्यात आलेले आहे. असे असताना जलसंपदा विभागील पद समान असताना येथे हा नियम लावण्यात आला नाही. तसेच देशात समान न्यायाचे तत्व लागू केले जाते. मग या भरती दरम्यान हा विचार का करण्यात आला नाही. असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
जलसंपदा विभागाने गेल्या ७-८ वर्षानंतर तब्बल ४हजार ४९७ रिक्त पदे भरण्यासाठी मोठी जाहिरात प्रसिध्द केली आहे. परंतु तत्सम अभ्यासक्रम प्राप्त हजारो विद्यार्थ्यांना स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदासाठी अर्जच करू शकणार नाहीत. इतर विभागांमध्ये तत्सम अभ्यासक्रम उत्तीर्ण असणारे उमेदवार पात्र आहेत पण जलसंपदा विभागात नाहीत, हा दूजाभाव दूर करून सेवाप्रवेश नियमात योग्य तो बदल करून आम्हा सर्व उमेदवारांना पात्र करावे. प्रामाणिक-होतकरू उमेदवारांवर खूप मोठा अन्याय होत आहे. स्पर्धी करणाऱ्या विद्यार्थ्यांनामध्ये आधिच मोठ्या प्रमाणात नैराश्याची भावना पसरली जात आहे. त्यात असे नियम केल्याने विद्यार्थ्यांनी कोणाकडे न्याय मागवा असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे शासनाने आमच्या मागण्यांचा विचार करुन मागणीचा विचार करुन तात्काळ निर्णय जाहीर करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी सिवीक मिररशी बोलताना केली.
जलसंपदा विभागाअंतर्गत प्रसिद्ध जाहिरातीत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदासाठी फक्त सिव्हिल डिप्लोमा किंवा डिग्री उमेदवारांना पात्र करण्यात आले आहे. पण इतर विभागांच्या जाहिरातीत कन्स्ट्रक्शन सुपरवायझर किंवा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन असे तत्सम पाठयक्रम उत्तीर्ण असणारे उमेदवार पात्र आहेत. त्यामुळे जलसंपदा विभागाने या पदाच्या सेवाप्रवेश नियमात योग्य तो बदल करून सदर पाठ्यक्रम उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना पात्र करावे, अशी मागणी अनेक उमेदवारांनी केली आहे.
- महेश घरबुडे, कार्याध्यक्ष, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रिक्त पदासाठी नोकर भरतीची जाहीरात प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यात शासनाने कनिष्ठ अभियंता (गट ब) यापदासाठी पदवीधरांना (डिग्री) बंदी घालण्यात असून पदविका (डिप्लोमा) धारकांनाच अर्ज करण्याची अट घातली होती. परंतु पदवीधारकांनाही पात्र करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. त्यानुसार शासनाने निर्णय बदला होता. आताही तसाच निर्णय जलसंपदा विभागातील पदासाठी शासानाने घेवून विद्यार्थ्यांना समान न्याय द्यावा.
- सुर्यकांत दराडे, विद्यार्थी.
जिल्हा परिषद, महानगरपालिका, लघु-पाटबंधारे विभाग आदी विभागांमध्ये असलेले स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पद आणि जलसंपादा विभागातील पद समानाच आहे. तर हे पद भरण्यासाठी वेगवेगळे निर्णय का लावण्यात आले आहेत. असा आमचा प्रश्न आहे. या विभागात भरती होत नाही. आम्ही गेल्या या पादासाठी तयारी करत आहोत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा विषय आहे. त्यामुळे त्यांनी यामध्ये लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी आहे.
- महादेव लांडे, विद्यार्थी