अवघी पुण्यनगरी झाली 'राम'मय!
पुणे: सर्वत्र फडकत असलेले फगवे झेंडे, उभारण्यात आलेल्या भगव्या स्वागत कमानी, शुभेच्छा देणारे मोठमोठे फलक, मंदिरांवर करण्यात आलेली विद्युत रोषणाई... आणि सातत्याने ‘जय श्रीराम’ असा होणारा जयघोष... अयोध्येत साकारण्यात आलेल्या भव्य श्रीराम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेची उत्सुकता असलेले असे भक्तिमय वातावरण सध्या शहरात दिसून येत आहे. रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने सोमवारी (दि. २२) मोठा जल्लोष साजरा केला जाणार असून शहरात पुन्हा जणू दिवाळीच साजरी केली जाणार आहे. (Pune News)
अयोध्येत सोमवारी श्रीराम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या निमित्ताने पुणे शहरात आनंदोत्सव आणि जल्लोष साजरा करण्यात येणार असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे. प्रत्येक भागात गणेश मंडळांसह, विविध संघटना, राजकीय पक्ष, रिक्षा संघटनाांनी एकत्र येत श्रीरामाची प्रतिमा असलेले झेंडे लावले आहेत. कोणी महाप्रसाद, लाडूचे वाटप, महाआरती, झेंडेवाटप, तर कोणी प्रसादाचे वाटप करणार आहे. लहान मुलांनीदेखील यात सहभाग घेतला असून गल्लीबोळात श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन केले जाणार आहे. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होताच मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार आहे. शहरासह उपनगर भागांत वातावरण राममय झाले आहे. चौकाचौकात भगवे झेंडे, फुगे, पताका, बॅनर्स आदींचे स्टॉल लागले असून रामभक्तांची गर्दी दिसून येत आहे. एकूण शहराला सर्वत्र दिवाळी सणाचे स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे. (Latest News Pune)
घराघरातदेखील श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन केले जाणार आहे. त्यामुळे पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी महिलांची लगबग सुरू आहे. प्रभू रामांच्या मूर्तीबरोबर आकर्षक सजावटीचे साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी बाजारात गर्दी केली आहे.
धार्मिक विधींसह महाआरतीचे आयोजन
सोमवारी श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन केले जाणार आहे. तसेच भजन, भावगीते, राम नामाचा जप अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. काही मंडळांकडून राम मंदिराच्या प्रतिकृतीची मिरवणूक काढली जाणार आहे. अनेक ठिकाणी भाविकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरभर भगवे वातावरण असून सर्वत्र राममय आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.