विद्युत केबलच्या स्फोटात तरुण जखमी
पुणे: खराडी परिसरातील थिटे वस्ती भागात साईराज मित्र मंडळाच्या येथे उघड्यावर असलेल्या महावितरणच्या उच्च दाबाच्या विद्युत केबलचा अचानक स्फोट झाल्याने रस्त्याने जाणाऱ्या एका तरुणाचे दोन्ही पाय भाजले. (latest news pune)
ही गंभीर घटना शुक्रवारी (दि. २६) घडली. शुभम केसरवाणी असे जखमी झालेल्या २७ वर्षीय तरुणाचे नाव आहे. तो मूळचा कलकत्याचा असून खराडीतील एका आयटी कंपनीमध्ये फायनान्स कंपनीमध्ये कर्मचारी आहे.
शुभम काही दिवसांपूर्वीच खराडीतील थिटे वस्ती येथे त्याच्या मित्रांसोबत भाड्याच्या खोलीमध्ये राहण्यास आला आहे. तो राहात असलेल्या इमारतीजवळच साईराज मित्र मंडळ आहे. मंडळासमोर एक किराणा मालाचे दुकान आहे. त्या दुकानात शिवम खरेदीसाठी गेला होता. त्यावेळी त्या दुकानासमोरील रस्त्यालगत असलेल्या उघड्यावर असलेल्या उच्च दाबाच्या केबलचा अचानक स्फोट झाला. त्यात शुभम सापडला. आगीच्या झळांमुळे त्याचे दोन्ही पाय भाजले तसेच दोन्ही हातांना आणि चेहऱ्याच्या एका बाजूला जखम झाली आहे. यानंतर तेथे उपस्थित असलेल्या तरुणांनी त्याला तत्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
महावितरणकडून या भागात विद्युत पुरवठा करण्यात येतो. काही दिवसांपू्र्वी एका इमारतीला विद्युत पुरवठा करण्यासाठी तसेच इतरांना वीजजोड देण्यासाठी उच्च दाबाची केबल रस्ता खोदून टाकण्यात आली आहे. परंतु साईराज मित्र मंडळाच्या येथेच नेमकी ही केबल उघड्यावर होती. ही केबल जमिनीत गाडण्याची मागणी अनेक वेळा खराडीतील महावितरण कार्यालयाकडे करण्यात आली होती. मात्र त्याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. तसेच कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही. कार्यालयातून त्या भागातील वायरमनचा संपर्क क्रमांक दिला जातो. ‘तो येऊन पाहणी करेल, मग त्यानंतर कार्यवाही होईल,’ असे सांगितले जाते. मात्र कोणतीही पाहणी होत नाही अन् कार्यवाहीदेखील होत नाही.
गेल्या अनेक दिवसांपासून ही केबल उघड्यावर पडून होती. केवळ महावितरणच्या हलगर्जीपणामुळेच हा अपघात झाला आहे, असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर महावितरणचा एक कनिष्ठ कर्मचारी घटनास्थळी दाखल झाला. त्याच्याकडे विचारणा केली असता वरिष्ठ अधिकाऱ्याने केबल जमीन गाडून घेण्यास सांगितले आहे, अशी माहिती त्याने परिसरातील नागरिकांना दिली.
चंदननगर पोलिसांची अजब कारवाई
शुभमचे दोन्ही पाय या घटनेत भाजले त्यावेळी त्याला जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु परिस्थिती गंभीर असल्याने त्याला मोठ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे शुभमला मगरपट्ट्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात असल्याने रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने पोलिसांनी याबाबत माहिती दिली. पोलीस कर्मचाऱ्यांनी शुभमशी संपर्क साधून त्याची एका कागदावर सही घेतली. त्यावेळी ‘तू बरा झालास की खराडीतील पोलीस चौकीमध्ये ये. तु्झ्याकडून इतर कागदपत्रांवरदेखील सह्या घ्यायच्या आहेत,’ असे सांगून वेळ मारून नेली. परंतु महावितरणच्या विरोधात साधी फिर्याद दाखल करून घेतली नाही किंवा त्याबाबत विचारलेही नाही, असे शुभमच्या जवळच्या एका व्यक्तीने ‘सीविक मिरर’ला सांगितले. याबाबत चंदननगरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांना विचारले असता, ‘‘या प्रकरणाची माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले जातील,’’ असे त्यांनी सांगितले.
महावितरणच्या उच्च दाबाच्या केबलचा स्फोट झाल्याने तरुणाला गंभीर इजा झाली आहे. यापूर्वीदेखील पाच वेळा अशा घटना घडल्या आहेत. प्रत्येक वेळी याबाबत महावितरणला तक्रार केली आहे. एखाद्याचा जीव गेल्यावरच अधिकाऱ्यांना जाग येणार आहे काय? तरुणाला खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्याच्या उपचाराचा खर्च आणि नुकसानभरपाई महावितरणने द्यावी, अशी आमची मागणी आहे.
- रोहित पठारे, सजग नागरिक
महावितरणकडून नागरिकांना कोणत्याही प्रकारची सुविधा दिली जात नाही. वीजजोड घेतानादेखील संबंधित व्यक्तीला केबल आणण्यास सांगितले जाते. वीजबिल थकले की एका क्षणात वीजपुरवठा खंडित केला जातो. एकूण महावितरणचा कारभार हा नागरिकांचा जिवाशी खेळण्याचा आहे. तरुणाला गंभीर दुखापत झाली असून त्याला आर्थिक मदत करावी, अन्यथा आंदोलन केले जाईल. भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, यासाठी महावितरण काय करणार आहे, हे स्पष्ट करावे.
- महेंद्र पठारे, माजी नगरसेवक
खराडीतील महावितरण कार्यालयाकडे याबाबत अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. मात्र या विभागाला नागरिकांची काळजी नाही. मुळातच ही केबल उघडी का ठेवण्यात आली, हे समजण्यापलीकडचे आहे. तक्रार करूनदेखील ती गाडली गेली नाही. महावितरणने ही केबल नागरिकांचा जीव घेण्यासाठी उघडी ठेवली आहे का, असा प्रश्न आमच्या भागातील नागरिक उपस्थित करू लागले आहेत. नेहमी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना फोन करावा लागतो. जबाबदारी मात्र कोण घेत नाही. भविष्यात अशा घटना घडल्यास याला महावितरणचे अधिकारी जबाबदार असतील. तसेच खराडीतील महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल.
- वैभव भोसले, सजग नागरिक
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.