संग्रहित छायाचित्र
पुणे: विद्युत खांबांमुळे शाॅक लागण्याच्या घटना रोखण्यासाठी पुणे महापालिकेने शॉकप्रूफ विद्युत खांब बसवण्याचा स्वागतार्ह निर्णय घेतला आहे. याअंतर्गत महापालिकेत नव्याने समावेश झालेल्या गावांमध्ये पहिल्या टप्प्यात एक हजार शॉकप्रूफ विद्युत खांब बसवण्यात येणार आहेत. (Latest News Pune)
रस्त्यावर तसेच पदपथावर बसविलेल्या विद्युत खांबांना सहज आपण हात लावतो. किंवा त्याला टेकून थांबतोही. त्यावेळी विजेचा धक्का बसेल अशी कोणतीही शंका मनात नसते. परंतु काही वेळा खांबामध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने विजेचा धक्का बसल्याने व्यक्तीच्या जिवावर बेतण्याच्या घटना घडल्या आहेत. पावसाळ्यामध्ये किंवा जिथे पाणी साठून राहते, अशा ठिकाणी मोठा धोका होण्याची शक्यता असते. मात्र आता काळजी करण्याची गरज नसून महापालिकेने शॉकप्रूफ विद्युत खांब बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेत (PMC News) नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये पहिल्या टप्प्यात हे एक हजार विद्युत खांब बसविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार फायबर रिइन्फोर्स पॉलिमर (एफआरपी) हे शॉकप्रूफ विद्युत खांब बसविले जाणार आहेत. म्हाळुंगे, सूस या समाविष्ट गावांमध्ये पहिल्या टप्प्यात एक हजार विद्युत खांब बसविण्यात येतील, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
लोखंडी विद्युत खांबांमध्ये अनेक तांत्रिक त्रुटी आढळून येतात. त्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होणाऱ्या घटना घडल्या आहेत. अशा घटना घडू नये, यासाठी महापालिका प्रशासन उपाययोजना करण्याचे विचारात होते. त्यानुसार, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे ‘एफआरपी’' हे शॉकप्रूफ विद्युत खांब बसविण्याचा महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी महापालिकेच्या विद्युत विभागाकडून केली जात आहे.
‘एफआरपी’ विद्युत खांब शॉकप्रूफ असल्याने नागरिकांची सुरक्षितता वाढणार आहे. जुन्या विद्युत खांबांच्या तुलनेत ‘एफआरपी’ खांब ५ ते १० टक्के स्वस्त आहेत. शिवाय हे विद्युत खांब मजबूत, पारदर्शी, कमी वजनामुळे वापरण्यास सोपे जाणार आहेत. लोखंडी खांबांना गंज लागण्याची शक्यता असते. मात्र ‘एफआरपी’ खांबांना गंज लागत नसल्याने विद्युत खांब दीर्घकाळ टिकण्याची शाश्वती देण्यात आलेली आहे. चुकून जर शॉर्टसर्किट होऊन आग लागली तर अशा घटनांमध्ये खांब वितळत नाही, अशी खात्री ‘एफआरपी’ खांबांविषयी प्रशासनाने दिली आहे.
संक्रांत सणामुळे मुले पतंग उडवतात. त्यावेळी पतंगाचा दोरा विद्युत खांबांमध्ये अडकल्याने धोका निर्माण झाल्याचे प्रकार समोर आले होते. तसेच रस्त्यावर उभारण्यात आलेल्या खड्ड्यांमध्ये अनेक वेळा पाणी साठलेले असते. त्यात खांबांमधील विद्युत प्रवाह उतरल्याने विजेचा धक्का बसण्याच्या घटना घडतात. यात अनेकांना आपला जीवदेखील गमवावा लागला आहे. त्यामुळे आता असे प्रकार घडू नये, यासाठी ‘एफआरपी’ खांब बसविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
शहरात उभारण्यात आलेले विद्युत खांब जीआयएस किंवा एमएस प्रकारचे आहेत. काही तांत्रिक त्रुटी राहिल्याने विजेचा धक्का बसण्याचा धोका असतो. असे प्रकार घडू नयेत यासाठी ‘एफआरपी’ खांब बसविण्याचे आदेश सर्व अधिकारी व क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत. या खांबांचा दर्जा चांगला असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात औंध, म्हाळुंगे रस्ता आणि सूस परिसरात हे खांब बसविले जाणार आहेत.
- श्रीनिवास कंदुल विद्युत विभाग प्रमुख, महापालिका
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.