संग्रहित छायाचित्र
पुणे : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील हे मुंबईमध्ये जाणार आहेत. त्याकरिता ते पुण्यामार्गे प्रवास करीत आहेत. त्यांचा मराठा आरक्षण मोर्चा पुण्यात मुक्कामी थांबणार आहे. हा मोर्चा मंगळवारी रांजणगाववरुन कोरेगाव भिमा मार्गे चोखीढाणी, खराडी येथे मुक्कामी येणार आहे. दुसऱ्या दिवशी बुधवारी हा मोर्चा लोणावळा येथे मुक्कामी जाणार आहे. या मोर्च्यामध्ये मोठया संख्येने नागरिक वाहनांसह सहभागी होणार असल्याने मार्चाच्या मार्गावर व आजूबाजूच्या परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी काढले आहेत. (Latest News Pune)
मंगळवारी दुपारी तीन वाजल्यानंतर अहमदनगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक वळवण्यात येणार आहे. ही वाहतूक मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरुन तसेच कोल्हापूर, सातारा येथुन अहमदनगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने कात्रज- खडी मशिन चौक - मंतरवाडी फाटा - हडपसर मार्गे सोलापूर रोडने केडगांव चौफुला नाव्हरे शिरुर मार्गे वळवण्यात येणार आहेत. तर, वाघोली, लोणीकंद मार्गे अहमदनगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने थेऊर फाटा (सोलापूर रोड) मार्गे केडगांव चौफुला नाव्हरा मार्गे शिरुर ते अहमदनगर अशी वळविण्यात येणार आहेत. पुणे शहरातून अहमदनगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने खराडी बायपासने उजवीकडे वळण घेऊन मगरपट्टा चौक- डावीकडे वळण घेऊन सोलापूर रोडने यवत-केडगांव-चौफुला-नाव्हरे- शिरुर मार्गे पुढे जातील. (Pune Police)
तर, बुधवारी अहमदनगरकडून पुणे शहराकडे येणारी सर्व वाहने थेऊर फाटा (लोणीकंद) येथुन केसनंद थेऊर मार्गे सोलापूर रोड अशी वळविण्यात येतील. वाघोली परिसरामधील वाहने वाघोली-आव्हाळवाडी-मांजरी खुर्द-मांजरी बुद्रुक, केशवनगर, मुंढवा चौक अशी वळविण्यात येतील. पुणे शहरातून अहमदनगरकडे जाणारी सर्व वाहने चंद्रमा चौकातून आळंदी रोड जंक्शन, विश्रांतवाडी, धानोरी, लोहगाव, वाघोली मार्गे जातील.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.