कसब्यातील मेट्रोच्या पादचारी भुयारी मार्गाचे काम सुरू, वाहतुक व्यवस्थेत बदल
महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लि. मार्फत पुण्यातील कसबा पेठेत पुणे मेट्रोचे काम सुरु करण्यात आले आहे. कसबा पेठ येथुन बुधवार पेठ मेट्रो स्टेशनपर्यंत पादचारी भुयारी मार्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे कसबा पेठेतील पवळे चौक ते कमला नेहरु चौक (अगरवाला रोड) या परिसरातील वाहतूकीत तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात आले आहेत.
याबाबत परिपत्रकाद्वारे पुणे पोलीसांच्या वाहतूक विभागाकडून माहिती देण्यात आली आहे. कसबा पेठेतील साततोटी चौकापासून बुधवार पेठ मेट्रो स्थानकापर्यंत पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग करण्यात येत आहे. त्यामुळे पवळे चौकातून कमला नेहरु रुग्णालयाकडे जाणाऱ्या तीनचाकी, चारचाकी आणि अवजड वाहनांना तात्पुरती बंदी करण्यात येत आहे. त्यामुळे दुचाकी वगळता अन्य वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.
पर्यायी मार्ग
अ) पवळे चौकातून अगरवाल रोडने कमला नेहरु हॉस्पीटलकडे जाणाऱ्या वाहनचालकांसाठी :-
१) पवळे चौकातून पुण्यश्वर रोडने कुंभारवेस चौक मार्गे कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालय उजवीकडे वळून बाबुराव आव्हाड पथ रोडने इच्छितस्थळी
२) पवळे चौकातून दगडी पाल रोडने मानिक चौक मार्गे फडके हौद चौक, गणेश रोडने इच्छितस्थळी
ब) कमला नेहरु हॉस्पीटल चौकातून आगरवाल रोडने पवळे चौकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांसाठी :-
१) कमला नेहरु चौकातून डावीकडे वळून महाराणा प्रताप रोडने देवजीबाबा चौक गणेश रोडने इच्छितस्थळी
२) कमला नेहरु चौक उजवीकडे वळून बाबुराव आव्हाड पथ मार्गे कसबा पेठ क्षेत्रिय कार्यालय, डावीकडे वळून कुंभारवेस मार्गे वीर संताजी घोरपडे रोडने इच्छितस्थळी
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.