पुणे: महापौर बंगल्यावर पाणी मीटर शोभेचे, पाण्याच्या वापराचे मोजमापच नाही!

पाणी वापराचे मोजमाप करण्यासाठी महापौर बंगल्यावर पाणी मीटर बसविण्यात आला आहे. मात्र मीटर बसविलेल्या पाण्याच्या पाईप लाईनमधून पाणीपुरवठा न होता घोले रोड क्षेत्रीय कार्यालयातून घेतलेल्या दुसऱ्या लाईन मधूनच पाण्याचा वापर होत असल्याची माहिती समोर आली आहे.

पाणी वापराचे मोजमाप करण्यासाठी महापौर बंगल्यावर (Mayor Bungalow) पाणी मीटर बसविण्यात आला आहे. मात्र मीटर बसविलेल्या पाण्याच्या पाईप लाईनमधून पाणीपुरवठा न होता घोले रोड क्षेत्रीय कार्यालयातून (Ghole Road Regional Offices) घेतलेल्या दुसऱ्या लाईन मधूनच पाण्याचा वापर होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महापौर बंगल्यावर पाण्याच्या वापराला कोणतेही मोजमाप नसून तेथील पाणीमीटर केवळ शोभेचे असल्याचा आरोप सजग नागरिक मंचने केला आहे.

पुणेकर जास्त पाणी वापरतात या आयुक्तांच्या विधानाबाबतचे वृत्त ‘सीविक मिरर’ प्रसिद्ध केल्यानंतर याची दखल घेत सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी महापौर बंगल्यावरील स्थितीची पाहणी केली. या पाहणीत पाणी मीटर दिसले, मात्र पाणीपुरवठा दुसऱ्याच पाईप लाईनने होत असल्याची माहिती वेलणकर यांनी दिली. यामुळे महापालिकेने ही धुळफेक नेमकी कोणासाठी केली असा संतापजनक सवाल वेलणकर यांनी उपस्थित केला आहे.  महापालिका आयुक्त, महापौर, आणि जिल्हाधिकारी बंगल्यावर पाणी मीटर बसवावे, म्हणजे तेथील पाणीवापर कळेल अशी मागणी करत होतो. मात्र याची दखल महापालिकेने गेतली नाही. मात्र आज पाहणी केली असता पाणी मीटर बसविल्याचे पाहून आनंद झाला. मात्र मीटरच्या माध्यामातून पाणीच घेतले जात नाही. त्यामुळे महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, अन्य वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या तत्काळ पाणी मीटर बसवावे. ही सर्व मंडळी दरडोई दरदिवशी किती पाणी वापरतात याची आकडेवारी पुणेकरांपुढे ठेवावे, असे पत्र आयुक्तांना दिले असल्याचे वेलणकर यांनी सांगितले. 

समान पाणीपुरवठा योजनेत बसविले जातात पाणी मीटर

पालिकेच्या समान पाणीपुरवठा योजनेत पाणी मीटर बसविले जात आहेत. जेवढ्या पाण्याचा वापर केला जाईल त्याप्रमाणे पाणीपट्टी भरावी लागणार आहे. पाणीपुरवठा विभागाने ३ लाख १८ हजार ८८७ बसविले जातील असे जाहीर केले आहे. त्यापैकी २ लाख ८२ हजार पाणी मीटर बसविण्यात पालिकेला यश आले आहे. मात्र उरलेले पाणी मीटर बसविण्यास अडथळे येत आहेत. विविध कारणानेमीटर बसविण्याचे काम रखडलेले आहे. बसविलेल्या मीटरनुसार किती पाणी वापरले जाते याचा अंदाज पाणीपुरवठा विभागाला अद्याप लागलेला नाही. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest