सुरेंद्र पठारे फाऊंडेशनच्या रक्तदान महाशिबीरात रक्तसंकलनाचा नवा विक्रम
पुणे: सुरेंद्र पठारे फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान महाशिबीरात काल (ता. २६) एकूण ३६७१ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. नागरिकांच्या मोठ्या प्रतिसादात हे शिबीर खराडी येथील पठारे इनडोअर स्टेडियम येथे पार पडले. या रक्तदान शिबीराचे उद्घाटन वडगावशेरी मतदारसंघाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या हस्ते करण्यात आले.
राज्यात सातत्याने जाणवणारा रक्ताचा तुटवडा भरून काढण्याच्या उद्देशाने २०२१ पासून फाऊंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी प्रजासत्ताक दिनाचे निमित्त साधत या रक्तदान महाशिबीराचे आयोजन करण्यात येते. मागील तीन वर्षांत आत्तापर्यंत ८६९० रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले होते. तसेच, रक्तदानाबद्दल जनजागृती करण्याचे कामही फाऊंडेशनच्या वतीने सातत्याने करण्यात येते.
“रक्तदात्यांच्या अभूतपूर्व प्रतिसादात हे शिबीर पार पडते आहे, याचा आनंद होतो आहे. मागील तीन वर्षांच्या रक्तसंकलानाचा विक्रम यावेळी मोडीत निघाला. हे महाशिबीर यशस्वी करण्यासाठी झटणारे सर्व डॉक्टर, आरोग्य कर्मचारी तसेच अनेक दिवसांपासून अहोरात्र मेहनत घेणारे सुरेंद्र पठारे फाऊंडेशन एकूण एक कार्यकर्ते व रक्तदानाचे महान कार्य करत भरभरून प्रतिसाद देणाऱ्या सर्व नागरिक बंधू-भगिनींचे आभार व्यक्त करतो. तसेच, येणाऱ्या काळातही प्रजासत्ताक दिनानिमित्त फाऊंडेशनच्या माध्यमातून हे रक्तदान महाशिबीर भरवण्यात येईल”, असा विश्वास यावेळी सुरेंद्र पठारे फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र पठारे यांनी व्यक्त केला.
अक्षय ब्लड बँक, ससून हॉस्पिटल ब्लड बँक तसेच रेड प्लस ब्लड बँक यांचे मोठे सहकार्य या रक्तदान महाशिबीराला लाभले.
या रक्तदान महाशिबीराच्या निमित्ताने कसबा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर, शिरूर मतदारसंघाचे आमदार अशोकबापू पवार भाजपा पुणे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, भाजपा महाराष्ट्र राज्य सरचिटणीस व माजी महापौर मुरलीधर मोहोळ, चंदननगर पोलीस निरीक्षक मनीषा पाटील व आदींनी आवर्जून उपस्थिती दर्शवली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.