संग्रहित छायाचित्र
कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ वकील शिशिर हिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अपघाताच्या घटनेनंतर अल्पवयीन मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यापूर्वी त्याच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणात मध्यस्थ असलेले आरोपी अश्पाक मकानदार आणि अमर गायकवाड या दोन आरोपींच्या ओळख परेड चाचणीसाठी शुक्रवारी विशेष सरकारी वकील हिरे यांनी न्यायालयात अर्ज केला असून, या अर्जास न्यायालयाने मंजुरी दिली आहे.
कल्याणीनगर अपघातानंतर अल्पवयीन मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यापूर्वी त्याच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट करण्यासाठी अग्रवाल दाम्पत्य आणि अश्पाक मकानदार यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक झाली होती. आरोपी मकानदार हा रक्ताचे नमुने बदललेल्या ठिकाणासह ससून रुग्णालय, येरवडा पोलीस ठाणे आणि बाल न्याय मंडळ येथे हजर असल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरण, साक्षीदारांकडील चौकशीत आढळून आले होते. रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट करण्यासाठी डॉक्टरांना देण्यासाठी मकानदारने घेतलेल्या चार लाख रुपयांपैकी तीन लाख रुपये डॉ. श्रीहरी हाळनोरकडून जप्त करण्यात आले. बाकीचे उर्वरित एक लाख रुपये कोणाला दिले हे अद्याप समोर आलेले नाही.
या प्रकरणात न्यायालयाने सर्व आरोपींची रवानगी कारागृहात केली आहे. दरम्यान, डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर, विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल आणि अमर गायकवाड यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. अश्पाक मकानदार याने २७ जून रोजी जामीन अर्ज मागे घेतला होता. मात्र पुन्हा त्याने न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. शुक्रवारी आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. मात्र विशेष सरकारी वकील यांनी या प्रकरणात आरोपींवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम आठ व बारा आणि भारतीय दंड संहितेच्या कलम १०९ व ३४ प्रमाणे कलमवाढ करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. तसेच विशाल अग्रवाल आणि अश्पाक मकानदार यांच्या जामीन अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी तपास अधिकारी गणेश इंगळे यांनी मुदतवाढ मागितली आहे.