पुणे: शहरातील अनेक रक्तपेढ्या रामभरोसे; अनियमितता आढळलेल्या दहा रक्तपेढ्यांवर 'एफडीए'कडून कारवाई

जीवनदान करण्यासाठी रक्तदान करा असे म्हटले जाते. मात्र, शहरातील अनेक रक्तपेढ्यांचा कारभार रामभरोसे सुरू आहे. अपुरे आणि अप्रशिक्षित कर्मचारी, निकृष्ट साधनांचा वापर अनेक रक्तपेढ्यांमध्ये आढळून आला आहे.

संग्रहित छायाचित्र

जीवनदान करण्यासाठी रक्तदान करा असे म्हटले जाते. मात्र, शहरातील अनेक रक्तपेढ्यांचा कारभार रामभरोसे सुरू आहे. अपुरे आणि अप्रशिक्षित कर्मचारी, निकृष्ट साधनांचा वापर अनेक रक्तपेढ्यांमध्ये आढळून आला आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने यावर कडक कारवाई सुरू केली असून पुणे शहरातील दहा रक्तपेढ्या आणि आठ रक्तसंकलन केंद्रांवर छापे टाकले.

२०१९ मध्ये शासनाने रक्तपेढ्यांसाठी कठोर नियमावली जारी केली. राज्य रक्त संक्रमण परिषदेद्वारे (एसबीटीसी) ना हरकत प्रमाणपत्राबरोबर (एनओसी) आता सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच अन्न व औषध प्रशासन (एफडीए) या विभागांच्या गव्हर्निंग बॉडीकडूनही परवानगी आवश्यक करण्यात आली आहे.

रक्तपेढ्यांना दर पाच वर्षांनी परवाना नूतनीकरण करण्यासाठी एसबीटीसीकडून ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्याचबरोबर आता रक्तपेढ्या आणि रक्त केंद्रांवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स अ‍ॅक्ट १९४० मधील तरतुदींनुसार लक्ष ठेवण्यात येते. या कायद्यान्वये काम करत नसलेल्या शहरातील १० रक्तपेढ्या आणि आठ रक्त केंद्रांवर कठोर कारवाई केली आहे. 

यासंदर्भात 'सीविक मिरर'सोबत बोलताना अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) पुणे विभागाचे सहआयुक्त गिरीश हुकरे म्हणाले, "पुणे शहरातील नियमबाह्य रक्तपेढ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. पुणे शहरात सर्वाधिक छापे टाकले आहे. भरारी पथकाद्वारे अचानक भेटी देऊन रक्तपेढ्यांची पाहणी केली जाते. त्यांच्या जुन्या नोंदी तपासल्या जातात. अनेक रक्तपेढ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळली आहे. त्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. या रक्तपेढ्यांमध्ये निकृष्ट दर्जाच्या वस्तूंचा वापर केला जात होता."

"एफडीएकडून रक्तदान शिबिरांचीही पाहणी केली जात आहे. कारण अनेक ठिकाणी प्रशिक्षित डॉक्टर आणि कर्मचारी नसल्याचे आढळून आले आहे. त्याचा रक्तदात्यांवर परिणाम होऊ शकतो," अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे साहाय्यक आयुक्त एस. व्ही. प्रतापवार यांनी 'सीविक मिरर'ला दिली.

रक्तपेढीसाठी आवश्यक कर्मचारी

- एमबीबीएसची पात्रता असलेले वैद्यकीय अधिकारी, रक्तपेढीतील एक वर्षाचा अनुभव किंवा एमबीबीएस डीसीपी किंवा पॅथॉलॉजीमध्ये एमबीबीएस, एमडी 

- नर्सिंगमधील डिप्लोमा किंवा पदवीची पात्रता असलेल्या नोंदणीकृत परिचारिका 

- परवानाधारक रक्तपेढीतील एका वर्षाच्या अनुभवासह वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ अभ्यासक्रमाचा डिप्लामा किंवा पदवी

"रक्तपेढीने संकलित झालेल्या प्रत्येक बॅगचा हिशोब ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, काही रक्तपेढ्यांच्या नोंदींमध्ये विसंगती आढळून आल्या. रक्त आणि रक्तघटक चाचणीतही त्रुटी दिसल्या आहेत. काही रक्तपेढ्यांकडून जादा शुल्क आकारले जात होते. त्याचबरोबर प्रशिक्षित कर्मचारी नव्हते. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे."

- गिरीश हुकरे, सहआयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन, पुणे विभाग

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest