संग्रहित छायाचित्र
राज्यातील विविध कारागृहांत १,२५० पेक्षा अधिक कैदी गंभीर स्वरूपाच्या आजाराने ग्रस्त आहेत. यामध्ये सिद्धदोष कैद्यांची संख्या सुमारे ५०० असून न्यायाधीन कैद्यांची संख्या सातशेपेक्षा अधिक आहे. या कैद्यांना ब्रेन ट्यूमर, एचआयव्ही, कर्करोग, हृदयासंबंधीचे आजार, क्षयरोग, कुष्ठरोग आदी व्याधींनी ग्रासले आहेत. तर काहीजण कोमात आहेत. अशा कैद्यांचा अहवाल न्यायालयाला पाठवून किरकोळ गुन्हे असलेल्यांना मुक्तता करण्यासंदर्भात विचारणा करण्यात येणार असल्याची माहिती कारागृह प्रशासन करते.
राज्यातील विविध कारागृहांमध्ये सिद्धदोष आणि न्यायाधीन कैद्यांची अधूनमधून आरोग्य तपासणी होत असते. यामध्ये अनेक कैद्यांना असाध्य रोग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्येसुमारे ८०० कैद्यांना हृदयरोग, २८६ जणांना एचआयव्ही तर १२५ कैदी मूत्राशयाच्या आजाराने ग्रस्त आहेत. १६ जण कर्करोगाचा सामना करीत आहेत. १७ जण कुष्ठरोगाने पीडित आहेत. ६ जणांना ब्रेनहॅमरेज झाल्यामुळे ते अचेतन अवस्थेत पडलेले आहेत. राज्यातील मध्यवर्ती कारागृहात रुग्णालय असते. या रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांपासून ते मानसोपचारतज्ज्ञांपर्यंतचे डॉक्टर असतात. मात्र, या ठिकाणी कैद्यांना चांगले उपचार मिळतील, याची खात्री नसते. असाध्य आजार झालेल्या कैद्यांना सरकारी रुग्णालयात पाठविले जाते. मात्र, तेथेही चांगले उपचार मिळतील, याची शाश्वती नसते. त्यामुळे कैद्यांचा आजार बळावत जातो.
‘‘गंभीर गुन्हे असल्यामुळे अशा कैद्यांना बाहेर सोडता येत नाही. सोडले तर त्यांना त्यांचे कुटुंब स्वीकारतील, याची शाश्वती नसते. त्यामुळे असाध्य रोग असलेले कैदी असह्य वेदनेने कारागृहातच वास्तव्यास असतात. त्यांना बाहेर सोडण्यासाठी कारागृह प्रशासन उच्च न्यायालयाकडे मागणी केली आहे. त्यावर अद्याप निर्णय झाला नाही. त्यामुळे अशा कैद्यांचा शेवटचा श्वाससुद्धा कारागृहातच घेतील,’’ असे कारागृहातील प्रशासनातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
राज्यातील ५०० कैदी मानसिक आजारी
राज्यातील साधारणत: पाचशे कैदी मानसिक आजारी आहेत. माणूस समाजशील प्राणी आहे. त्याला कुटुंब, नातेवाईक किंवा मित्र मंडळींपासून अर्थात समाजापासून दूर ठेवले तर त्याला मानसिक आजार होतो. राज्यातील अनेक कारागृहात गंभीर गुन्ह्यांच्या कैद्यांना अतिसुरक्षित अशा बराकीत ठेवले जाते. मध्यवर्ती कारागृहात अंडासेल आहे. या सेलमध्ये कैद्यांना एकट्याला राहावे लागते. त्यामुळे असे कैदी मानसिक आजारी होतात. त्यांच्यावर कारागृहातील मानसोपचारतज्ज्ञ उपचार करतात. त्यांना नियमित औषधोपचार घ्यावे लागतात. संगीत ऐकणे, टीव्ही पाहणे, वृत्तपत्र, पुस्तके वाचणे आवश्यक असते. मात्र, अनेक कैदी असे पर्याय निवडत नाहीत. ते आपल्या बराकीत एकटेच पडून असतात. सतत विचार करीत असतात. त्यामुळे त्यांचा आजार बळावतो. त्यानंतर त्यांना मनोरुग्णालयात दाखल करण्याची वेळ येते.
ललित पाटीलसारख्यांना स्पेशल ट्रिटमेंट
कारागृहात पैसेवाल्यांना चांगले उपचार मिळतात. ते आजारी असो की आजाराचे नाटक करणारे... त्यांना ससूनमध्ये महिनोंमहिने राहता येते. याचे मोठे उदाहरण म्हणजे ड्रग्ज तस्कर ललित पाटील. हा ससून रुग्णालयात उपचार घेत होता. येथून तो ड्रग्जचे रॅकटे चालवत असल्याचे उघड झाले आहे. ललितला ससूनमध्ये पाठविण्यासाठी येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक, ससूनचे अधिष्ठाता यांचा सहभाग असल्याचा ठपका ठेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
कारागृहात प्रत्येक बराकीत टीव्हीची सोय केलेली असते. यासह कारागृहात ‘येरवडा प्रीझन रेडिओ’ हे कम्युनिटी रेडिओ आहे. यावर कैदीच रेडिओ जॅकी असतात. ते रेडिओच्या माध्यमातून विविध कार्यक्रम सादर करीत असतात. कारागृहात मोठे सुसज्ज ग्रंथालय आहेत. यामध्ये विविध लेखकांची पुस्तके, मासिके, साप्ताहिके, वृत्तपत्रे आहेत. याचा कैदी पुरेपूर वापर करतात. - वरिष्ठ तुरुंग अधिकारी, येरवडा मध्यवर्ती कारागृह