पुणे: नगर रस्त्याची लवकरच कोंडीमुक्ती!

येरवड्यातील शास्त्रीनगर येथील उड्डाणपूल, ग्रेडसेपरेटरच्या कामासाठी केंद्र, राज्य सरकारच्या पुरातत्त्व विभागाने महापालिकेला ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे रखडलेल्या पुलाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

संग्रहित छायाचित्र

शास्त्रीनगर चौकातील फ्लायओव्हर, ‘ग्रेड सेपरेटर’ ला पुरातत्त्व विभागाचा ग्रीन सिग्नल, पुलाचे काम झाल्यावर होणार कोंडीतून सुटका

येरवड्यातील शास्त्रीनगर येथील उड्डाणपूल, ग्रेडसेपरेटरच्या कामासाठी केंद्र, राज्य सरकारच्या  पुरातत्त्व विभागाने महापालिकेला ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे रखडलेल्या पुलाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. या पुलाचे काम झाल्यानंतर  नगर रोडवरील मोठ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार आहे.

नगर रस्त्यावर प्रामुख्याने येरवडा ते वाघोली दरम्यान वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी शास्त्रीनगर, खराडी बायपास येथे उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटरसाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात निधीची तरतूद करण्यात आली होती. त्यात नगर रस्त्यावरील दुमजली उड्डाणपूल थेट विमानगरपर्यंत आणण्यात यश आल्याने खराडातील उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लागला. मात्र, शास्त्रीनगरजवळ असलेल्या आगाखान पॅलेस हे राष्ट्रीय स्मारक असल्याने येथील उड्डाणपुलाच्या कामासाठी आवश्यक असलेले  पुरातत्त्व विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र ( एनओसी) बंधनकारक ठरले होती. ही ‘एनओसी’ मिळत नसल्याने पुलाचे काम रखडले होते. या संदर्भात वडगाव शेरी मतदारसंघाचे आमदार टिंगरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार केंद्र, राज्य सरकारची एनओसी मिळाली आहे.  २ मे रोजी याबाबत ना हरकत प्रमाणपत्र महापालिकेला मिळाले आहे. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर प्रत्यक्ष या कामाला सुरुवात होईल.

"नगर रोड परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी गेल्या साडेचार वर्षांपासून पाठपुरावा करत आहे. नगर रस्त्यावर शिरूर ते वाघोलीपर्यंत होणारा दुमजली उड्डाणपूल रामवाडीपर्यंत आणण्यात यश आले आहे. तसेच येरवडा ते विमानगरपर्यंतची बीआरटी काढल्याने वाहतूक कोंडी सुटली आहे. आता  पुरातत्त्व विभागाची एनओसी मिळाल्याने शास्त्रीनगर येथील उड्डाणपूल, ग्रेडसेप्रेटरच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. ही कामे पूर्ण झाल्यावर निश्चितपणे नगर रस्ता कोंडीमुक्त आणि सिग्नल मुक्त होईल."

— सुनील टिंगरे, आमदार, वडगाव शेरी मतदारसंघ.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest