सह्याद्री रूग्णालयाचे अवाच्या सवा बिल; आयएमएकडे वाढत्या तक्रारी

बड्या कार्पोरेट रुग्णालयांमधील संपूर्ण उपचारप्रणाली बिगरवैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या हातात गेली आहे. त्यामुळे या रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर बिले येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने पुण्यातील सह्याद्री रुग्णालयाचा समावेश आहे.

संग्रहित छायाचित्र

रुग्णांना मदत करण्यासाठी समिती स्थापन करणार

Reported By: नोझिया सय्यद

बड्या कार्पोरेट रुग्णालयांमधील संपूर्ण उपचारप्रणाली बिगरवैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या हातात गेली आहे. त्यामुळे या रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर बिले येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने पुण्यातील सह्याद्री रुग्णालयाचा समावेश आहे. येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून अवाच्या सवा बिल आकारण्यात येत असल्याबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशनकडे (आयएमए) येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण वाढले आहे.

सह्याद्री रुग्णालयाकडून (Sahyadri Hospital) जादा बिल लावण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. त्यात अलीकडच्या काळात वाढ झाली आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी आता इंडियन मेडिकल असोसिएशन एक समिती स्थापन करणार आहे. ही समिती जादा बिलांच्या घटनांबाबत रुग्णांना मदत करेल.

या संदर्भात ‘सीविक मिरर’ला माहिती देताना हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया, आयएमए पुणे चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील म्हणाले, ‘‘इंडियन मेडिकल असोसिएशन (Indian Medical Association) केवळ डॉक्टरांसाठी काम करते, असे अजिबातही नाही. रुग्णांचे हक्क आणि त्यांच्या तक्रारींबाबतही आम्ही काम करतो. बड्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक होत आहे. अनेक ठिकाणी वाढती बिले येत आहेत. रुग्णाच्या बिलांमधील वाढ धक्कादायक आहे. असे करणाऱ्यांमध्ये सह्याद्री रुग्णालयाचाही समावेश आहे. या रुग्णालयाबाबत सर्वाधिक तक्रारी आयएमएकडे आल्या आहेत. त्यामुळे या संदर्भात आम्ही या रुग्णालयाशी थेट संपर्क साधला.

‘‘सह्याद्री रुग्णालयाबाबत अनेक तक्रारी येत आहेत. एक जबाबदार वैद्यकीय संस्था म्हणून आम्ही या रुग्णालयाशी चर्चा केली. त्यांच्या बिलिंग विभागातील अधिकाऱ्यांशी संवाद साधला. या रुग्णालयाने वैद्यकीय उपचारांबाबत असलेल्या दरांचे पालन करावे, असे त्यांना सांगितले. याबाबत आयएमए आता एक अभिनव कल्पना राबवत आहे. वाढत्या बिलांमुळे त्रस्त झालेल्या रुग्णांना आम्ही मार्गदर्शन करणार आहोत. त्याचबरोबर रुग्णालयांशीही चर्चा करणार आहोत,’’ अशी माहितीही डॉ. संजय पाटील  यांनी ‘सीविक मिरर’ला दिली.

सह्याद्रीसारख्या रुग्णालयांच्या बिलांच्या वाढत्या घटनांमागील कारणांबद्दल विचारले असता डाॅ. पाटील म्हणाले, ‘‘काॅर्पोरेट रुग्णालयांच्या प्रशासकीय विभागात आता डॉक्टरांपेक्षा नॉन-डॉक्टर अधिकाऱ्यांचे वर्चस्व आहे.  डॉक्टरांना बिलाच्या प्रक्रियेमध्ये सामावून घेतले जात नाही. उपचारासाठी येणारा अंदाजे खर्च रुग्णाला सांगणे आवश्यक असते. हा अंदाजित खर्च आणि प्रत्यक्षातील बिल यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत आढळून आली आहे. त्यामुळे सह्याद्रीसारख्या कार्पोरेट रुग्णालयांच्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांशी संवाद वाढवण्यावर आमचा भर राहणार आहे.’’

सह्याद्री रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ( सीईओ) अबरार अली दलाल यांच्याशी ‘सीविक मिरर’ने संपर्क साधला असता त्यांनी त्यांच्या रुग्णालयातील वाढत्या बिलिंग समस्यांबाबतच्या आरोपांना उत्तर दिले. ते म्हणाले, “आतापर्यंत आमच्याकडे बिलाबाबत अत्यंत कमी तक्रारी आहेत. रुग्णांना संपूर्ण माहिती मिळावी, त्यांच्या तक्रारींचे निवारण व्हावे, हा आमचा नेहमीच प्रयत्न असतो.  सह्याद्री रुग्णालय पारदर्शकपणे काम करून रुग्णांची काळजी घेते. तरीही याबाबत अभिप्राय आणि सूचना असतील तर त्याचे आम्ही स्वागतच करू.’’

अनेक रुग्णालयात मार्केटिंगची टीम

अनेक कार्पोरेट रुग्णालयांमध्ये (Corporate Hospitals) आता मार्केटिंगची टीम नेमण्यात आली आहे. रुग्णालयाचे उत्पन्न वाढविण्यासाठी ती प्रयत्न करत असते. काही ठिकाणी तर  वेतनावर काम करणाऱ्या डॉक्टरांना टार्गेट देण्यात आली आहेत, असे वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या एका कार्यकर्त्याने सांगितले. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest