संग्रहित छायाचित्र
कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोल्युशन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या लाचखोरीप्रकरणी तपासात टाळाटाळ केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागास हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. (Pune ACB)
लाचललुपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयाचा अवमान केल्याने ७ मे रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. १५ मार्च २०२४ रोजी नवी दिल्ली येथील माजी पोलीस अधिकारी आणि पर्यावरण कार्यकर्ते, प्रीतपाल सिंग पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (एसीबी) तक्रार अर्ज दाखल केला होता. कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोल्युशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला पर्यावरणविषयक मंजुरी मिळवण्यासाठी पैशांचा वापर केला. हिंजवडी येथील प्रकल्पाच्या परवानगीसाठी अज्ञात सरकारी अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप करत चौकशीची मागणी केली होती.
याबाबत एसीबीकडे दाद मिळाली नाही. त्यामुळे प्रीतपाल सिंग यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली. त्यावर न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला चौकशी करण्यास सांगितले होते. मात्र, त्याबाबत चौकशी झाली नाही, असा आरोप करत सिंग यांनी ॲड. रोहन नहार आणि ॲड. प्रतीक राजोपाध्ये यांच्यामार्फत न्यायालयाचा अवमान झाल्याची याचिका दाखल केली आहे. न्यायालयाचा आदेश असतानाही एसीबीने या प्रकरणाच्या तपासात जाणूनबुजून अवज्ञा केली आहे, असे म्हटले आहे.
गुन्ह्यांची गंभीरता लक्षात घेऊन तसेच पुराव्याशी छेडछाड तसेच पुरावे नष्ट करण्याची शक्यता लक्षात घेऊन, तपासाचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर एसीबी कार्यालयास भेट दिली. मात्र, या प्रकरणात तपासात प्रगती होत नसल्याबद्दल कोणालाही एफआयआरबद्दल माहिती नसल्याचे दिसून आले. हे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन आहे, असे सिंग यांनी म्हटले आहे.
दरम्यान, एसीबीच्या अधिका-यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात जावे लागत असल्याने या आदेशाला स्थगिती देण्याची विनंती करणारा अर्ज केला होता. परंतु न्यायाधीश हेडाऊ यांनी ही याचिका फेटाळली. सिंग यांच्या तक्रारीनुसार, “खासगी संस्था आणि कंपन्यांची चौकशी करण्यासाठी कोणत्याही परवानगीची आवश्यकता नाही. आरोपी कंपनीने सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशन (एसईसी), यूएसए समोर गुन्हा कबूल केला आहे आणि न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे की, जोपर्यंत तक्रारीची चौकशी होत नाही तोपर्यंत तपास एक इंचही पुढे सरकणार नाही.’’
सिंग यांनी महाराष्ट्र राज्य एसीबी, पुणे, पुणे शहर आयुक्त, कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोल्युशन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, कंपनीचे माजी उपाध्यक्ष आणि मेसर्स लार्सन अँड टुब्रो लिमिटेड यांच्या विरोधात खासगी फौजदारी तक्रार दाखल केली होती. याबाबत ‘सीविक मिरर’ने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी त्यावर बोलण्यास नकार दिला.