मापात पाप...; हजारो व्यापारी वजन काटे पडताळणीशिवाय वापरत असल्याने सामान्यांची होते फसवणूक
पुणे जिल्ह्यातील सुमारे ३० हजार व्यापाऱ्यांनी इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांचे मुद्रांकन आणि पडताळणी केली नसल्याचे समोर आले आहे. यामुळे ग्राहकांची खुलेआम फसवणूक होण्याची शक्यता असून या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा वैधमापन शास्त्र विभागाने दिला आहे. मात्र, या विभागाचे अधिकारी- कर्मचारी तपासणीसाठी येतच नसल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. (Pune News)
पुणे जिल्ह्यात सुमारे सव्वा लाख नोंदणीकृत व्यापारी आहेत. मात्र, यातील केवळ ९४ हजार इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांची तपासणी झाली आहे. इलेक्ट्रॉनिक वजनकाटे बाजारात बंधनकारक झाल्यापासून कित्येक व्यापाऱ्यांनी त्याची खरेदी केली. मात्र, तेव्हापासून त्यांची पडताळणी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे वजनात ग्राहकांची लूट होत आहे. या काट्यांच्या पडताळणी व मुद्रकांनापोटी १३ कोटी ८४ लाख रूपये वसुल झाल्याची माहिती पुणे वैधमापन शास्त्र विभागाचे उपनियंत्रक डी.जी. महाजन यांनी दिली. पान ७ वर
पुणे शहर , पिंपरी-चिंचवड महापालिकेसह पुणे जिल्ह्यातील ९४ हजार व्यापाऱ्यांनी इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांची पडताळणी व मुद्रांकन करून घेतले आहे. शहर व जिल्ह्यातील आणखी वीस ते तीस टक्के व्यापाऱ्यांनी आपल्या वजन काट्यांची मुद्रांकन व तपासणी करून घेतली नाही. त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते.
- डी. एस. महाजन ,
उपनियंत्रक, वैध मापन शास्त्र विभाग, पुणे
...तरी कारवाई नाही
हॅाटेलमध्ये मद्य देताना पूर्वी ‘ मापात पाप ‘ केल्यास कारवाई केली जात होती. मात्र , दिल्ली हॅाटेल आसोशियनने या विरोधात सर्वेाच्च न्यायालयात धाव घेतली होती. पंचतारांकित हॅाटेलमधील ॲबिएन्स, चांगल्या दर्जाच्या सेवा दिल्या जातात म्हणून या ठिकाणी वजन, मापे व आवेष्टित अधिनियम लागू शकत नसल्याचा आदेश सर्वेाच्च न्यायालयाने दिले असल्याचे वैध मापन शास्त्र विभागाचे सहनियंत्रक सुरेश चाटी यांनी संागितले.